Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded District Assembly Election 2024 : काँग्रेसमध्ये असताना जिंकलेल्या जागा अशोक चव्हाण भाजपकडे खेचून आणणार का ?

Jagdish Pansare

Ashok Chavan Political News : राजकीय आयुष्यातील तीस वर्ष काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे महासचिव म्हणून 1995 मध्ये सक्रीय झालेल्या अशोक चव्हाण यांनी मग मागे वळून पाहिले नाही. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी काँग्रेस नेतृत्वाने त्यांना दिली. पण 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तापालट झाला आणि दहा वर्षांनी अशोक चव्हाण या पक्षात गेले.

भाजपने राज्यसभेवर संधी देत त्यांचे पुनर्वसन केले, पण हक्काच्या नांदेड आणि मराठवाड्यात चव्हाण यांच्या प्रतिमेला धक्का बसला. (Ashok Chavan) चव्हाण कुटुंबाचा शब्द प्रमाण समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याची झलक दिसली. अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर मराठा नेता सोबत असताना लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात महायुतीचा दारुण पराभव झाला.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जिल्ह्यातील नांदेड दक्षिण, भोकर आणि देगलूर-बिलोली या जागा जिंकल्या होत्या. आता काँग्रेसमध्ये असताना जिंकलेल्या या जागा आणि त्याशिवाय एखादा अतिरिक्त मतदारसंघ अशोक चव्हाण भाजपकडे खेचून आणतात का? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड विधानसभेला कायम राहणार नाही, असा दावा भाजपचे राज्यातील नेते करताना दिसत आहेत.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी देगलूर-बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. (Nanded) स्वतःच्या भोकर विधानसभा मतदारसंघातून कन्या श्रीजया आणि देगलूर-बिलोलीमधून जितेश अंतापूरकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे अद्याप पक्षासोबत कायम आहेत. त्यामुळे हा मतदारसंघही भाजपकडे खेचण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न असणार आहे.

लोकसभा निवडणकीत काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्ते व मतदारांनी अशोक चव्हाण आणि महायुतीला दणका देत वसंतराव चव्हाण यांना निवडून दिले होते. दुर्दैवाने त्यांचे नुकतेच निधन झाले आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही विधानसभेसोबत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेच्या दृष्टीने अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. भोकर या आपल्या हक्काच्या मतदारसंघात ते कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत.

मुलगी श्रीजया हिला निवडून आणणे चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. याशिवाय देगलूर-बिलोली आणि नांदेड दक्षिण या काँग्रेसकडे असलेल्या तीनही जागा अशोक चव्हाण यांना आता भाजपसाठी निवडून आणाव्या लागणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अशोक चव्हाण यांना आंदोलकांच्या रोषाला अनेकदा सामोरे जावे लागले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना मेहुणे भास्कर पाटील खतगावकर यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ केली आहे. अशावेळी अशोक चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या दुसऱ्या परीक्षेत उतीर्ण होतात का ? नांदेडकर पुन्हा अशोक चव्हाणांना साथ देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT