NCP (SP) News Sarkarnama
मराठवाडा

Beed Election: पक्षात नसलेल्यांना तुतारी, पक्षातल्यांची नाराजी; `राष्ट्रवादी`ची खेळी कि फसलेला डाव ?

NCP SP Strategy Controversy: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बीड, केज, परळी, माजलगाव आणि आष्टी हे मतदार संघ लढविणार आहे. तर, गेवराईची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे.

Datta Deshmukh

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेतील यश आणि सरकारबद्दलच्या शेती, नोकरी, बेरोजगारी आदी कारणांमुळे असलेल्या नाराजीमुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांचा ओढा आहे. पण, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात बंडखोरी आणि नाराजी वाढली आहे. पक्षाने निवडणुकीसाठी पक्षात नसलेल्यांना तुतारी वाजवायला दिली तर पक्षात घेतलेल्यांना नाराज करुन नेमके साध्य काय केलेय? याचे कोडे आहे.

हा फसलेला डाव म्हणायचा का काही खेळी? हे निकालानंतरच कळेल. तर, खासदारांनी बीड व केजच्या उमेदवारीबाबत विरोध करत परळी व माजलगावचे उमेदवार मात्र स्वत:च्या मनाजोगे मिळविले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बीड, केज, परळी, माजलगाव आणि आष्टी हे मतदार संघ लढविणार आहे. तर, गेवराईची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे.

येथून माजी मंत्री बदामराव पंडित यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाने परळीतून राजेसाहेब देशमुख, आष्टीतून युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, केजमधून माजी आमदार पृथवीराज साठे तर माजलगावमधून मोहन जगताप, बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. मात्र, पक्षात नसलेल्या राजेसाहेब देशमुख यांना परळी व मोहन जगताप यांना माजलगावची उमेदवारी दिली.

बीडमधून संदीप क्षीरसागर व पृथवीराज साठे या दोघांना निष्ठेमुळे पवार उमेदवारी टाळणार नाहीत हे निश्‍चित होते. तरीही खासदार बजरंग सोनवणे यांनी दोघांनाही सुरुवातीपासून स्पर्धक वाढविले आणि उमेदवारीसाठी विरोधाचे वातावरण तयार केले. या दोघांबाबतचा शब्द पक्षाने ऐकला नाही म्हणून मग त्यांनी परळी व माजलगावबाबत प्रतिष्ठा केली. परळीतून राजाभाऊ फड, सुनिल गुट्टे असे पक्षात प्रवेश केलेल्यांची नाराजी ओढावून घेतली.

माजलगावमध्येही माजी आमदार राधाकृष्ण होकेंची नाराजी ओढावून घेतली. पक्षप्रवेश करुनही उमेदवारी न मिळाल्याने होकेंनीही रमेश आडसकरांची साथ दिली. बीडमधून देखील डॉ. ज्योती मेटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येवढ्या लोकांना पक्षात घेण्याचे आणि नाराज करण्यातून साध्य काय, असा प्रश्न आहे.

जयदत्त क्षीरसागर यांचे नेटवर्क जिल्हाभर असल्याने आष्टी, बीड, केज, माजलगाग, गेवराईतही फायदा झाला असता. तर, रमेश आडसकर यांचाही माजलगावसह केज, परळी व बीडमध्ये फायदा झाला असता. मात्र, अशा नेत्यांना पक्षाने बाहेर ठेवले आणि नाराजी ओढावून घेतल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT