Imtiaz Jalil-Kadri-Owasi Sarkarnama
मराठवाडा

ओवेसींचे इंजेक्शन एमआयएममधील गटबाजी संपवण्यासाठी लागू पडणार?

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले. आगामी औरंगाबाद आणि मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या शिवाय पक्षांतर्गत गटबाजी संपवण्यासाठी त्यांनी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना देखील इंजेक्शन टोचले. आता हे इंजेक्शन प्रभावी ठरते का हे लवकरच दिसून येईल.

औरंगाबादेत झालेल्या एमआयएम पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदा गटबाजीचे जाहीर प्रदर्शन झाले. २०१४ मध्ये थोडक्यात आमदारकी हुकलेले आणि २०१९ मध्ये हे अंतर वाढत गेल्यामुळे पक्षातच अडगळीत पडलेले डाॅ. गफ्फार कादरी आणि आमदार ते खासदार असे प्रमोशन झालेले इम्तियाज जलील यांच्यातून सध्या विस्तव देखील जात नाही.

काॅंग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावलेले विशेषतः तरुण मतदार सोबत असून देखील एमआयमला अतंर्गत गटबाजी महापालिका निवडणूकीत महागात पडू शकते. कार्यकर्ता मेळाव्यात इम्जियाज-कादरी यांचे दोन गट असल्याचे प्रकर्षांने जाणवले होते. इम्तियाज जलील यांच्यावर भ्रष्टाचाराचे संपत्ती जमावल्याचे आरोप विरोधकांकडून झाले. त्याचा समाचार इम्तियाज यांनी आपल्या पद्धतीने घेतला, पण पक्षाचे आणि लोकहिताची कामे करतांना आपल्याला कसा त्रास दिला जातो, हे सांगतांना ते भाऊक देखील झाले होते.

कादरी-इम्तियाज यांच्यात समेट घडवण्याचे ओवेसी यांनी याआधी देखील प्रयत्न केले. पण ते हैदराबादला गेल्यानंतर या दोन नेत्यांची तोंड पुन्हा विरुद्ध दिशेला गेली. या दोन महत्वाच्या नेत्यांमधील बेबनाव महापालिका निवडणुकीत परवडणार नाही, हे लक्षात आल्यामुळेच ओवेसी यांनी पुन्हा एकदा समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. इम्तियाज जलील यांच्या घरी कादरींना नेते ओवेसी यांनी `तुमच्यातील वाद मिटवा, पक्ष वाढीसाठी एकदिलाने काम करा`, असे आवाहन देखील केले.

या शिवाय खुल्ताबाद येथील बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात देखील चर्चा झाली. एकंदरित ओवेसी यांच्या दौऱ्याने एमआयएममधील उत्साह शिगेला पोहचला आहे. पण तो कायम टिकून राहील का? इम्तियाज-कादरी खरंच झालं गेलं विसरून एकदिलाने काम करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT