Shivsena UBT News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी चाचपणी सुरू केली असून, पूर्वतयारीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. (Parbhani Political News) परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेने आजपर्यंत शिवसेना हे नाव व धनुष्यबाण या चिन्हाला कौल दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते निर्णायक ठरली आणि संजय जाधव यांचा विजय झाला.
परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार (Shivsena) शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) असल्याने इंडिया आघाडीमध्ये परभणीची जागा शिवसेनेकडे असणार हे उघडच आहे. तसेच खासदार जाधव (Sanjay Jadhav) व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्यात नेहमीच सहकार्याचे धोरण असल्याने जाधव यांना फायदाच होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असणारे विद्यमान खासदार संजय जाधव यांना नवे नाव व चिन्हासह मैदानात उतरावे लागणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेला पाठपुरावा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी रस्त्यांच्या कामाबद्दल असणारी जनतेची नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. (Marathwada) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या परभणी येथील भाषणात जाहीरपणे याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. जाधव हे वारकरी असून, प्रतिवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात. तसेच परभणीत त्यांनी प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे भव्य आयोजनही केले होते. त्यामुळे या वेळीही नशिबाचा कौल त्यांना मिळतो का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेतल्या आहेत. जागावाटपामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. पक्षाने जिंतूर विधानसभा मतदारसंघांच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
तसेच माजी मंत्री व आमदार बबन लोणीकर यांचे पुत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात आहे. जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे राहिल्यास २०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर हे प्रबळ दावेदार असणार यात शंका नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडाळीनंतर जिल्ह्यात राजेश विटेकर यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला.
राजेश विटेकर यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांना भरघोस निधी खेचून आणला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी व भारत राष्ट्र समिती यांचेही उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. परभणी लोकसभेचा आतापर्यंतचा इतिहास पाहता शिवसेनेसाठी हा मतदारसंघ मजबूत मानला गेला आहे. पक्षात फूट पडली असली तरी परभणीकरांची सहानुभूती ठाकरे गटाच्या बाजूने आहे. या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत बंडू जाधव पुन्हा लोकसभेत धडक देतील, असेच सध्याचे चित्र आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.