Mla Babajani Durani
Mla Babajani Durani Sarkarnama
मराठवाडा

चाळीस वर्षापासून पवार साहेबांसोबत ; आताही कार्यकर्ता म्हणून काम करणार

सरकरनामा ब्युरो

परभणी ः सात वर्षापासून मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे, अगदी पक्ष स्थापनेपासूनच मी जिल्ह्यात काम करतोय. माझ्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण सध्या पक्षातील अंतर्गत गटबाजीला खतपणी घालण्याचे काम काही मंडळींकडून होत आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

चाळीस वर्ष म्हणजेच एस काॅंग्रेसपासून मी शरद पवार साहेबांसोबत काम करतो आहे, यापुढेही एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीतच काम करणार असल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून दुर्राणी यांनी नुकताच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१६ नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर दुर्राणी यांनी आज सकाळीच याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. दुर्राणी यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली होती. आता ते राष्ट्रवादीतच राहणार, की मग पक्षही सोडणार, अशा चर्चांना देखील दिवसभर जिल्ह्यात उधाण आले होते.

अखेर सायंकाळी त्यांनी प्रसार माध्यमांना आपली भूमिका स्पष्ट केली. दुर्राणी म्हणाले, पक्षातील अंतर्गत गटबाजी मोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. पण काही मंडळी त्याला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे या पदावरून दूर होण्याचा मी निर्णय घेतला. सात वर्ष राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतोय. माझ्याच कार्यकाळात नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक संस्थामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली.

राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापने आधीपासून म्हणजेच एस काॅंग्रेसपासून मी शरद पवार साहेबांसोबत काम करतोय. चाळीस वर्ष मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. यापुढे देखील पक्षात राहून एक कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. माझ्या राजीनाम्यानंतर पक्ष ज्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवेल, त्यांना माझे पुर्ण सहकार्य असेल,असेही बाबाजानी दुर्राणी यांनी स्पष्टे केले.

एकंदरित दुर्राणी यांची देहबोली आणि त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. प्रंचड नाराजीतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे ते पक्ष देखील सोडतात की काय? अशी जोरदार चर्चा होती. परंतु दुर्राणी यांनीच आता या चर्चांवर पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT