बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. देशभरातही ती राबविली जाणार आहे. मात्र, राज्यातील अलीकडील काही गदारोळ घडवणाऱ्या घटना पाहता आमदारांची योग्यता पडताळणी मोहीम हाती घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे. काही आमदारांकडे काही विशेष (अव)गुण असल्याचे जगजाहीर झाले आहे. त्याची पडताळणी आम्ही केली असता, आम्हाला काही (बिनबुडाची) तथ्ये आढळली ती पुढीलप्रमाणे...
दोन आमदारांनी यंदाचे विधिमंडळ अधिवेशन गाजवलं. खरं तर हे दोन्ही आमदार कायम ‘आग्रही’ भूमिकेत असतात. हे दोन्ही आमदार साध्या पद्धतीनं बोलले तरी ते हमरीतुमरीवर आले की काय, असाच भास होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्वग्रह निर्माण होतात. एक आमदार ‘खाऊ की गिळू’ या नजरेनं पाहतात असा एक पूर्वग्रह, तर दुसरे आमदार सदा तार सप्तकात विधानसभाध्यक्ष, मंत्र्यांनाही जाब विचारत असतात हाही दुसरा पूर्वग्रह. यापैकी एक आमदार विधानभवन परिसरात बोलत उभे असताना दुसऱ्या आमदारांची गाडी वेगात येते काय, ते दार जोरात उघडतात काय... अन् मग ‘मुंब्रा’-‘जत’मधील गल्ली-बोळांतल्या दादांसारखे दोघांचे भांडण जुंपल्याची बातमी सर्वदूर पसरली. या आमदारांचे कार्यकर्तेही ‘आग्रही’ भूमिकेतच असतात. त्यामुळे हे कार्यकर्ते विधानभवन परिसरात आले अन् ‘आग्रही’ भूमिकेतून परस्परांना आपले मुद्दे पटवून देऊ लागले. त्यांच्या आग्रही अभिनिवेशामुळे परस्परांजवळ जाऊन हातवारे करत ‘आपले मुद्दे तुम्हाला कसे पटत नाहीत’ असं म्हणत त्यांनी परस्परांची छाती, डोकी हलवली. लोकांनी विधानभवनात हाणामारी असा बभ्रा केला. आमच्या पडताळणीत हे आमदार थेट आग्रही भूमिकेचेच असल्याचे निदर्शनास आले आहेत. बाकी आक्षेपार्ह काही नव्हतेच.
हे आमदार भयंकर ‘संवेदनशील’ आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना थोडंही इकडं तिकडं चालत नाही. अगदी ‘परफेक्शनिस्ट’. अखेर जनतेच्या हिताचा विचार त्यांना करावाच लागतो. खराब अन्न दिल्याने त्यांना त्यातून विषबाधा होईल अन् पर्यायानं त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडणारा त्यांचा लोकप्रतिनिधी रुग्णालयात पडेल, मग त्यांचे प्रश्न कोण मांडणार, या एकमेव ‘उदात्त’ हेतूनं त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘नेसत्या वस्त्रानिशी’ लगबगीनं येऊन संबंधित कँटिनवाल्याला समज दिली. संबंधित कँटिनवाल्याला त्यांनी खराब वरणाचा वास घ्यायला सांगितले. मात्र, त्याने सर्दी झाल्यानं कुठलाच वास येत नाही, असं सांगितल्यावर या आमदार महोदयांनी त्याची सर्दी मोकळी व्हावी म्हणून त्याच्या नाकावर ठोसा मारला. ‘खानदानी मुष्टियोद्धा’ या नात्यानं सर्दी-पडशावर त्यांच्याकडे थपडा-ठोसे मारण्याचा एक जालीम उपाय होता. तो त्यांनी करुणावश अंमलात आणला. मात्र, दुष्ट विरोधक अन् प्रसिद्धिमाध्यमांनी त्याला चुकीचं वळण दिलं. आयोगाने त्याची दखल घेऊन संबंधित आमदारांच्या या कृत्याची पडताळणी करून त्यांना ‘क्लीन चीट’ द्यावी, अशी मागणी या आमदारांच्या समर्थकांकडून होत आहे.
हे मंत्रिमहोदय ‘समाजकल्याणा’साठीच जन्माला आले असावेत. धूम्रपानामुळे या समाजाचे काय नुकसान होते, धूम्रपान कसे चुकीचे आहे हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते आपल्या अंतःपुरात धूम्रपान करत होते. कुणा नतद्रष्टानं त्याचा ‘व्हिडीओ’ केला. तसंच दीन-दुःखितांच्या मदतीसाठी म्हणजेच ‘समाजकल्याणा’साठी त्यांनी आणलेले पैसे बॅगेत होते. त्यातील काही बाहेर डोकावत होते. या नतद्रष्टानं तेही टिपलं अन् ‘व्हायरल’ केलं. भलाईचा जमानाच नाही बुवा. या मंत्रिमहोदयांचा खासगीपण जपायचा अधिकारही असा हिरावून घ्यायचा? खरं तर समाजकल्याण करण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांची दुःख समजून घेण्यासाठीच हे मंत्रिमहोदय समर्पित आहेत. त्यासाठीच आदरातिथ्य उद्योगातही हे मंत्रिमहोदय पदार्पण करणार होते. आदरातिथ्य उद्योग म्हंजे सोप्या मराठीमध्ये ‘हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री’. त्यासाठी संभाजीनगरमधील एक हॉटेल खरेदी करून हे मंत्रिमहोदय गरजू पर्यटकांचं आदरातिथ्य, सेवा पुरवणार होते. पण तिथेही त्यांचे विरोधक आडवे आले. त्यामुळे या मंत्रिमहोदयांना आपल्या पुत्राच्या माध्यमातून अतिथींचं आदरातिथ्य करण्याची एक चांगली संधी हुकली. हे महाराष्ट्राचंच अदृश्य नुकसान आहे.
संबंधित मंत्रिमहोदयांना शेतकऱ्यांविषयी फार कळवळा आहे. शेतकऱ्यांनी कृषी कर्जवाटप केलेली रक्कम मुला-मुलींच्या साखरपुडा-लग्नासाठी न वापरता शेतीसाठीच वापरावी, याबाबत ते विशेष आग्रही आहेत. केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठीच तर ते ‘ओसाडगावची पाटीलकी’ सहन करत आहेत. ‘शेती करणे म्हणजे बेभरवशाचा जुगारच आहे,’ अशी तक्रार शेतकरी करत असतात. त्यामुळे हा जुगार काय असतो बुवा, याचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी ‘जंगली रमी’ खेळून पाहिली. तर कोण गहजब! अखेर जुगाराचा अनुभव घेतल्याशिवाय त्याचे दुष्परिणाम कळणार कसे? मात्र दुष्ट विरोधकांनी पराचा कावळा केला. ‘विसरा हमी अन् खेळा रमी’ असली बोचरी टीका केली. खरं तर ‘जुगाराच्या अनुभवाची हमी म्हणून खेळलो रमी’ अशी त्यांची परोपकारी भूमिका होती. मंत्रिमहोदय थोडा वेळ रमीचे पत्ते काय खेळले, त्यांचा पत्ताच कट करण्याचा डाव विरोधकांनी आखला. प्रदेशाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत पत्ते काय उधळले. मग बुकलाबुकली. मंत्रिमहोदयांना राजकारणातून उठविण्यासाठी रचलेला हा पत्त्यांचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.