Santosh Bangar FIR Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Bangar News : फडणवीसांनी झापलेल्या शिंदेंच्या आमदाराला होऊ शकतो कारावास; कायद्यातील शिक्षेची तरतूद पाहिली का...

Voting secrecy violation : आमदार संतोष बांगर यांच्यावर हिंगोल शहर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम १२८ आणि भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajanand More

Local body election news : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा मतदान केंद्रातील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. बांगर यांच्या केंद्रातील वर्तनानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना फटकारले आहे. मतदान केंद्रात गेल्यापासून बाहेर पडेपर्यंत त्यांच्या वर्तवणुकीवर बोट ठेवले जात आहे.

आमदार बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम १२८ आणि भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीतील मंगळवारा बाजार कन्या शाळा येथील मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षांनी याबाबत तक्रार दिली आहे. एका महिलेला मतदान चिन्ह मतदान कक्षात जाऊन सांगितले व गोपनियतेचा भंग केला तसेच घोषणा दिल्या व त्यांच्यासोबत छोटा मुलगा मोबाईल घेऊन आत आला, असे तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा सिध्द झाल्यास त्यांना कारावासाची किंवा दडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कायद्यात काय आहे तरतूद?

सार्वजनिक सेवकाने कायद्याचे पालन न केल्यास 'बीएनएस'मधील कलम २२३ अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे अडीच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तर लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ नुसार कलम १२८ अंतर्गत मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिक्षेची तरतूद आहे. कलम १२८ मधील उपकलम एकमध्ये म्हटले आहे की, निवडणुकीवळी मतदानाच्या किंवा मतमोजणी संबंधात काही काम करतो असा प्रत्येक अधिकारी, लिपिक अन्य व्यक्ती याला मतदान गुप्त राखावे लागेल. तसेच ते राखण्यास मदत करावी लागेल आणि ज्यामुळे अशी गुप्तता भंग पावेल असे मानण्याजोगी कोणतीही माहिती, कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही.

कलम १२८ मधील उपकलम दोननुसार, जी व्यक्ती मतदानाबाबत गुप्तता पाळणार नाही, म्हणजे गोपनीयतेचा भंग करेल ती व्यक्ती तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल, अशी शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर कलम १३० मध्ये मतदान केंद्रांमध्ये किंवा त्यांच्या जवळपास प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात घोषणाबाजी करत एकप्रकारे कायद्याचे उल्लंघन केले आहे. या कलमांतर्गत अडीचशे रुपये दंडाची तरतूद आहे.

संतोष बांगर यांनी मतदान कक्षात मोबाईलचा सर्रासपणे वापर केला. त्यांच्यासोबत असेलल्या इतरांनीही मोबाईल मतदान कक्षात आणले होते. मोबाईलवरून मतदान करतानाचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. हा कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्यातील कलम १३१ नुसार मतदान केंद्रांत गैरशिस्त वर्तन केल्याबद्दल तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे. तसेच दंडाचीही शिक्षा होऊ शकते.

मतदान कक्षात आमदार बांगर यांच्या वर्तवणुकीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मतदान केंद्रात गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यासाठी कायद्यानुसार मतदान केंद्राध्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देऊ शकतात. तसेच पोलीस अधिकारी संबंधित व्यक्तीला अटकही करू शकतात.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT