Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी इराण-इस्त्रायल युध्दापासून ते केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर त्यांच्या खास शैलीत रोखठोक भाष्य केलं. आपण या ठिकाणी महाराष्ट्रासाठी आहोत असं सांगतानाच आपल्याला राज्याची सत्ता भविष्यात हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणार म्हणजे घेणारच असा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता.19 मार्च) शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त व गुढी पाडवा मेळाव्यात तडाखेबंद भाषण केलं. या भाषणात त्यांनी इराण-इस्रायल युद्धावरुन मोदी सरकारवरही निशाणा साधला. तसेच त्यांनी महाराष्ट्राचा विकास, वाहतूक,शिक्षण,वाढती गुन्हेगारी,महिलांची सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी केली.
1. आपण या ठिकाणी आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत. आपल्याला ही सत्ता भविष्यात हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणार म्हणजे घेणार
2. जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होताना आपण त्यांना साथ द्यायला हवी होती. अली खामेनी गेल्यानंतर आपण देशाच्या पंतप्रधानांनी एकही निषेधाचं वक्तव्य केलं नाही.
3.मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राला तीन ट्रिलियनची इकॉनॉमी बनवायचे आहे असे बोलत आहेत. पण महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचे कर्ज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात फक्त 2 लाख कोटींचे कर्ज महाराष्ट्रावर होते
4. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे, मात्र संपूर्ण राज्यात ड्रग्ज विकले जात आहेत. शाळा,कॉलेजमध्ये ड्रग्स जाताहेत, तरूणी-तरुणी व्यसनाधीन होत आहेत. ड्रग्जच्या आहारी जाऊन आपण महाराष्ट्राचं काय करणार आहोत?
5. राज्यात NCRB च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी 4500 ते 5500 मुलं बेपत्ता होतात. यात मुलींचे प्रमाण जास्त असून मुंबईत दरवर्षी 2 हजार पेक्षा जास्त लहान मुलं गायब होतात. त्यांच्या आई-वडिलांचं काय होत असेल? आपला महाराष्ट्र असा होता?
6. आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी झाली. या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होताहेत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याचं कोणाला काहीही पडलेलं नाही.
7.महाराष्ट्र नेक्स्ट नावाची एक वेबसाईटही राज ठाकरेंनी यावेळी लाँच केली. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा पर्याय देण्यात आला आहे. या वेबसाईटवर एकूण 27 विषयांचा समावेश आहे. त्यात शेतीपासून ते आरोग्य व्यवस्था, वाहतूक सुविधा यांसारखे विषय आहे.
8. इराण हा देश जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला, पण त्या देशाच्या पाठीमागे आपण राहिलो नाहीत. याचा आपल्याला भविष्यात निश्चितच त्रास होणार. आपण नेमके कुठे जात आहोत, हेच समजायला वाव नाही.
9. ‘सगळं काही अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात घातलं जातं असून आमदार आणि खासदारांना फक्त पैसा दिसतोय. महाराष्ट्र स्वतःचं अस्तित्व गमावतोय आणि हे लोक राज्य विकायला काढल्यासारखे वागत आहेत. कोणतीही सुरक्षिततेची हमी नसलेल्या राज्यात आपण राहत आहोत का?’
10. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला मोठं केलं, कृपया आपल्या त्या महापुरुषांकडे कोणत्याही जातीतून पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं आणि त्यांनी काय योगदान दिलंय ना, ते सर्वात महत्त्वाचं आहे.