Maharashtra government grants one-year age relaxation for MPSC Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Age Limit: MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सूट; 31 डिसेंबर 2027 पर्यंत निर्णय लागू

MPSC Age Limit News: महाराष्ट्र सरकारने MPSC सह सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत दिली आहे. पात्र उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधीही मिळणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

MPSC Government Decision: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय सरळसेवा भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. ही सवलत 31 डिसेंबर 2027 पर्यंत लागू राहणार आहे. यामुळे वयोमर्यादेमुळे भरती प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने 5 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या उमेदवारांना मिळणार वयोमर्यादेत सवलत?

शासन निर्णयानुसार, 1 जानेवारी 2026 पासून 5 नोव्हेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या ज्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा अद्याप पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सूट मिळणार आहे.

तसेच, 5 नोव्हेंबर 2026 पासून 31 डिसेंबर 2027 पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनाही एक वर्षाची वयोमर्यादा शिथिलता लागू असेल.

MPSC व्यतिरिक्त इतर भरती परीक्षांनाही निर्णय लागू

विशेष म्हणजे, ही सवलत केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. MPSC व्यतिरिक्त इतर भरती यंत्रणांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांनाही या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहणार आहेत.

तसेच, काही पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विशिष्ट कारणांमुळे स्वतंत्र कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असेल, तर अशा पदांसाठीही निर्धारित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे.

पात्र उमेदवारांना पुन्हा अर्जाची संधी

या निर्णयामुळे यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही आयोगावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकवेळची विशेष बाब म्हणून अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

1 जानेवारी 2028 पासून पुन्हा जुनी वयोमर्यादा

दरम्यान, ही सवलत कायमस्वरूपी नसून केवळ एकवेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2028 रोजी किंवा त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातींसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये किंवा 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयात निश्चित केलेली मूळ कमाल वयोमर्यादाच लागू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT