Mumbai Bomb Threat Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai Bomb Threat : महाराष्ट्रातील मोठी बातमी : मुंबईच्या महापौरांसह अमिताभ बच्चन यांचे घर, महापालिका कार्यालय, शाळा उडवून देण्याची धमकी

Mumbai municipal office and schools bomb threat news : मुंबईच्या महापौरांसह अमिताभ बच्चन यांचे घर आणि महापालिका शाळांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याची बातमी. जाणून घ्या ताजे अपडेट आणि सुरक्षा यंत्रणांची भूमिका.

Rashmi Mane

मुंबईत बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला धमकीचा ईमेल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या ईमेलमध्ये मुंबईतील काही शाळा, महालक्ष्मी रेसकोर्स परिसर आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकारामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मुंबईतील 3 ते 4 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेलही आले आहेत. या संदेशांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ईमेलमध्ये “मुंबई बॉम्बे बोलेगा - खलिस्तान झिंदाबाद!, आणि School 1:11pm आपल्या मुलांना वाचवा” असा मजकूर असल्याची माहिती समोर आली आहे.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित शाळा आणि ठिकाणांची तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथक अर्थात BDDS च्या मदतीने तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, धमकीचा ईमेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्यावर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकीही ईमेलमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे. 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान बंगल्याला लक्ष्य करण्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे. याशिवाय, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमादरम्यान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिल्याचेही सांगितले जात आहे.

या ईमेलमध्ये काही खलिस्तानी संघटनांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ईमेलमधील दावे आणि त्यांची सत्यता अद्याप तपासाचा विषय आहे.

महापौर कार्यालय, शाळा आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित ठिकाणांना धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांसमोर सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांकडून ईमेलचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, संबंधित ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. धमकीमागील व्यक्तीची ओळख आणि संभाव्य धोका याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT