Nagpur News: नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास कायम राहणार नाही, असे चित्र सध्या नागपूर जिल्ह्यात आहे. कोणी कोणाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या सोयी आणि फायद्यानुसार नवे गडी शोधत आहेत. काँग्रेस आणि वंचितचे राज्य पातळीवर वितुष्ट आहे. असे असले तरी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत काही जागांवर घरोबा करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने मात्र आपले पत्ते राखून ठेवले आहेत.
जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल २७ नगराध्यक्ष आणि ५४९ नगरसेवकपदांसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक नगर परिषदेत पक्षातील अंतर्गत चढाओढ आणि युतीचे गणित यामुळे राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ती आघाडी तुटलेली दिसते. त्यामुळे सध्या कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यात ताळमेळ दिसून येत नाही. माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार संजय मेश्राम हे आघाडीवर चर्चा करतील. सर्वच पक्षात स्वबळाचा नारा देण्यात आला असला तरी अधिकृत घोषणा कोणीही केली नाही. नरखेड, काटोल, कोंढाळी, मोवाड या नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा प्रभाव आहे. काँग्रेससोबत युती करतानाही ते आपले अस्तित्व टिकवूनच निर्णय घेतील. हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी, वानाडोंगरी, डिगडोह, नीलडोह येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे रमेश बंग हे प्रमुख नेते आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचेही अस्तित्व आहे. चार वर्षानंतर येथे निवडणूक होत असल्याने अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांना नाराज करण्याची पक्षांची मुळीच इच्छा नाही. त्यामुळे स्वतंत्र चुली मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रत्येक पक्ष स्थानिक नेत्यांच्या बळावर आणि गटबाजीच्या समीकरणात अडकलेला आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जात आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार आहे. भाजपने आधीपासूनच स्थानिक कार्यकर्त्यांवर भर दिला असून, युतीऐवजी स्वबळाची मोहीमच सुरू ठेवली आहे. भाजपचे रामटेक जिल्हा निवडणूक प्रमुख अरविंद गजभिये यांनी युतीसंबंधी कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले.
मित्रपक्षांकडून प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील संभाव्य युती जिल्ह्यातील समीकरणांमध्ये बदल घडवू शकते. दोन्ही पक्षांनी ताकदीनुसार जागावाटपाचे धोरण आखण्याची चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे, तिथे वंचित आघाडी पाठबळ देईल; आणि वंचित प्रबळ असलेल्या ठिकाणी काँग्रेस सहकार्य करेल, अशी अनौपचारिक रणनीती आखली जात आहे. ही युती प्रत्यक्षात आकार घेतल्यास भाजपच्या परंपरागत मतदारसंघांमध्ये त्रिकोणी लढती निर्माण होण्याची शक्यता वाढेल.
शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मात्र परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सत्तेत असूनही दोन्ही गटांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे तेही स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. सध्या महायुतीची शक्यता दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे यांच्यावर भिस्त आहे. राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वातील पहिलीच निवडणूक असल्याने जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व टिकविण्यास त्यांना चांगलाच कस लागणार आहे. तीच अवस्था शिंदे सेनेची असून रामटेक, पारशिवनी वगळता त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.
राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांचा मतदारसंघ असला तरी मागील निवडणुकीत रामटेकमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार निवडून आला होता. तर १३ जागाही भाजपच्या वाट्याला गेल्या होत्या. पारशिवनीमध्ये तीच स्थिती होती. यामुळे या निवडणुकीत शिंदेसेना स्वतः अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.