Nana Patole News
Nana Patole News Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole News : आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रीपदाबाबत पटोलेंचं मोठं विधान,''२०१४ मध्ये काँग्रेसला धोका...''

सरकारनामा ब्यूरो

Political News : कोणत्याही कारणानं महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. यानंतर राजकीय क्षेत्रात तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. आता पुन्हा पटोलेंनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीनं २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आता आगामी काळात महाविकास आघाडीतील जागावाटप,मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही सतर्क आहोत असं सूचक वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)च्या नेतेमंडळींकडून मुख्यमंत्रीपदाविषयी दावे प्रतिदावे सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचंही लपून राहिलेलं नाही.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आता सावध झाली आहे. नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य करताना आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असं म्हटलं आहे. पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

पटोले काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) म्हणाले, महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल. ज्या पद्धतीने २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आता आम्ही सतर्क असल्याचं स्पष्ट करत एकप्रकारे राष्ट्रवादीलाच इशारा दिला आहे. विधानसभेच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असंही पटोले म्हणाले.

...तोवर हे मत मांडायला काही हरकत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल नाना पटोले यांचं मत वैयक्तिक स्वरूपाचं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीत कसलीही चर्चा झाली नाही. साधारणपणे तसंच असतं. ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होतो. यात काही चुकीलेलं नाही.

परंतू, आमची याबाबत अशी काही चर्चा अथवा बैठक झालेली नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोवर हे मत मांडायला काही हरकत नाही असंही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT