Narendra Jadhav committee report Sarkarnama
महाराष्ट्र

Narendra Jadhav Committee Report : त्रिभाषा बॉम्ब! ‘पहिलीपासून तीन भाषा’ प्रस्तावानं खळबळ! जाधव समितीची शिफारस समोर? हिंदीवरून पुन्हा...

Maharashtra Education Policy 2026 : डॉ. नरेंद्र जाधव समितीने त्रिभाषा धोरणासंदर्भात राज्य सरकारला अहवाल सादर करत, त्रिभाषा अंमलबजावणीची शिफारस केली आहे.

Pradeep Pendhare

Tri Language Policy Maharashtra : त्रिभाषा धोरणासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारला सादर केला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह समितीचे सदस्य या वेळी उपस्थित होते. या अहवालानुसार, राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासूनच त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात समितीने शिफारस केल्याचे मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांनी सांगितले.

मराठी मुद्यावरून ठाकरे बंधूंसह मराठी एकीकरण समिती आक्रमक आहे. या अहवालामुळे मराठीविरुद्ध हिंदी भाषेवरून, राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. मुंबईत या संघर्षाने जोर धरला आहे. आता या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यावर, त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागलं आहे.

नरेंद्र जाधव यांच्या समितीने त्रिभाषेसाठी केवळ हिंदीच नव्हे, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम लक्षात घेऊन इतर भाषांचे पर्यायही उपलब्ध करण्याबाबत शिफारस केल्याचे समोर येत आहे. माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे अहवाल सादर केला. त्रिभाषा धोरणाच्या अहवालासोबतच शालेय‍ शिक्षणात विशेषत: पहिलीपासून ‘एआय’वर आधारित अभ्यासक्रम लागू करण्याबाबत डॉ. जाधव समितीने पुरवणी अहवालही सादर केला.

त्रिभाषा अहवालात नेमक्या कोणकोणत्या शिफारशी करण्यात आल्या, याबाबत अधिक भाष्य करण्यास डॉ. जाधव यांनी नकार दिला आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव समितीचा अहवाल रखडला होता; मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे (Election) निकाल हाती येताच समितीने अहवाल सादर केल्याने यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

डॉ. जाधव समितीचा प्रवास

राज्य सरकारने 30 जून 2025 ला गठित केलेल्या जाधव समितीला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. यात 19 नोव्हेंबर 2025, पाच डिसेंबर 2025 आणि अखेर 4 फेब्रुवारी 2026पर्यंत मुदतवाढ दिली होती.

समितीने 20 डिसेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून तेथील स्थानिकांचे मते जाणून घेतली. त्याच आधारावर डॉ. जाधव यांनी सुरुवातीला 20 डिसेंबर 2025आणि त्यानंतर चार जानेवारी 2026 रोजी सादर करण्याचे जाहीर केले होते; मात्र समितीला मुदतवाढ दिल्यानंतर तो आज, 9 फेबुवारीला सरकारकडे सादर केला आहे.

पहिलीपासून ‘एआय’वर अभ्यासक्रम

डॉ. जाधव समितीने त्रिभाषा धोरणासोबतच, त्यांच्याकडे आलेल्या विविध प्रकारच्या सूचनांचा आधार घेत राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून एआयवर आधारित अभ्यासक्रम, शिक्षण प्रणाली विकसित करण्याची शिफारस करणारा पुरवणी अहवाल सादर केला आहे. जगभरातील शिक्षण क्षेत्रात ‘एआय’चा वापर वाढत असताना या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून पूरक अहवाल सादर केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT