Mumbai News: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकारण गेले महिने दोन महिने ढवळून निघालं होतं. सत्ताधारी महायुती किंवा विरोधकांची महाविकास आघाडी दोन्ही बाजूला रोज होत असलेल्या दावे-प्रतिदावे यांनी राजकीय घडामोडींनी वेग धरला होता. पण शरद पवारांच्या ऐनवेळी झालेल्या एन्ट्रीनं राज्यसभेची गणितंच बदलली. अखेर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध झाल्यानं महायुती वा महाविकास आघाडीत आनंदांचं वातावरण आहे. अशातच आता विधान परिषदेच्या आमदारकीवरुन जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म 13 मे रोजी संपणार आहे. ठाकरे पु्न्हा एकदा विधान परिषद लढवणार का नाही हे सध्या गुलदस्त्यात आहे. पण त्यांच्या आमदारकीबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा असूनही तिसर्या क्रमांकाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी मविआच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेवर पाणी सोडावं लागलं.आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआ ठाकरेंसाठी रस्ता मोकळा करणार की अडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याचदरम्यान, उद्धव ठाकरेंना त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीवरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना विधान परिषद आमदार व्हायचं असेल, तर त्यांनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा, एकनाथ शिंदे यांना एक फोन करावा. एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांना फोन केला तर ते सगळे सोडून तुमच्या मागे उभे राहतील, असा सल्ला नरेश म्हस्के यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जावी, अशी मागणी उचलून धरली जात आहे. पण त्यांच्या उमेदवारीवरुन कुठेतरी उलटसुलट चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा देणार नव्हते. त्यांचा त्याबाबतचा निर्णय आदल्या रात्रीच झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जेव्हा ठाकरेंना कळाले, तेव्हा त्यांनी घाबरून पवार यांना पाठिंबा दिला, खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यावरुन ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सन्मान राखणं, हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. खासदार सुप्रिया सुळे आदल्या दिवशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या होत्या. त्या बाहेर पडत नाहीत, तोच आदित्य ठाकरेंचं ट्विट आलं की, ‘आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आमचा उमेदवार उभा करणार.’
यावेळी नरेश म्हस्केंनी राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातही भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटणार होते, याची शंका आल्यानेच त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. जर त्यांनी उमेदवार दिला असता तर तो निवडून आला नसता, असा दावा म्हस्के यांनी केला आहे.
नरेश म्हस्के यांनी याचवेळी ऑपरेशन टायगरवर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, सध्या अधिवेशन काळ असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत, त्यामुळे ऑपरेशन टायगर सध्या थंड आहे, आगे आगे देखो होता है क्या, असंही त्यांनी स्पष्ट करत मोठ्या राजकीय इनकमिंगचेही संकेत दिले आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.