Election Commission : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षावर दावा सांगण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादीवरून कायदेशीर लढाई सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोगात सोमवारपासून सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत सुनावणी सुरू आहे. सोमवारी सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारदेखील थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगात होणाऱ्या या सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या या सुनावणीला शरद पवार गटाकडून शरद पवार (शक्यता), खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, समीर भुजबळ आणि सूरज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी निवडणूक आयोगासमोर अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून कागदपत्रे जमा करण्यात आली असून, सोमवारपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांना म्हणजेच काकांना मिळणार की दादांना मिळणार? असा प्रश्न आहे.
निकाल राखून ठेवण्याची शक्यता
या संदर्भात पुढील काही दिवस सलग सुनावणी होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार हेदेखील आज दिल्लीत आहेत. त्यामुळे सुनावणीच्या वेळी ते आयोगात उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
(Edited by Sachin Waghmare)