devendra fadnavis, nawab malik
devendra fadnavis, nawab malik sarkarnama
महाराष्ट्र

देवेंद्रजी, आता माफी मागा ; नवाब मलिक संतापले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला होता. ''दिवाळीची सुरवात मलिकांनी (Nawab Malik)लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. दिवाळी संपण्याची वाट पाहा. अंडरवर्ल्डशीसोबत मलिकांचे असलेल्या संबधांचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे, असे फडणवीस म्हणाले. त्याला मलिकांनी उत्तर दिलं आहे.

नवाव मलिकांनी (nawab malik)आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा फडणवीसांवर (devendra fadnavis) घणाघात केला. फडणवीसांनी माफी मागावी, असे मलिक म्हणाले. मलिक म्हणाले, ''माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. हा आरोप खोटा आहे. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्जसारखी एकही वस्तू सापडली नाही, तरीही फडणवीसांनी आरोप केले आहेत. याबाबत फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे''

नवाब मलिक म्हणाले, ''सुमारे २६ दिवसांत दोन महिलांशिवाय मी कुणाचीही आई, बहीण, सून, मुलगी किंवा कोणत्याही महिलेवर आरोप किंवा त्यांचा उल्लेख केलेला नाही. दोन्ही महिलांचा उल्लेख केवळ त्यांच्याशी काही गोष्टी जोडलेल्या असल्याने आला. जे लोक महिलांशी संबंधित प्रश्न उपस्थित करतात, त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो. इतरांच्या आई, बहीण महिला नाहीत का.

संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या पत्नीला ईडीच्या कार्यलायत पोहचवले. किरीट सोमय्यांनी अजित पवारांच्या आईचे नाव घेतले.''

''देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर काही आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की आरोप केल्यानंतर ते कधी माफी मागत नाही. माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. देवेंद्रजी, वानखेडे आपल्या जवळचे आहेत. पंचनामा मागवून घ्या, जावयाच्या घरातून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. वानखेडे यांच्या सांगण्यावरून 14 जानेवारी रोजी जावयाच्या घरी छापेमारी करण्यात आली. तेव्हा माध्यमांना चुकीची माहिती देण्यात आली. आता देवेंद्रजी माफी मागणार का,''असा सवाल मलिकांनी उपस्थित केला.

''चार्जशीटला कमजोर करण्यासाठी वानखेडे यांच्यावर हल्ला करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्रजी तुमच्याकडे वकिलीची पदवी आहे. एनडीपीएस कायद्यात 6 महिन्यांच्या आत आरोपपत्र दाखल केले जाते. ते झालेले आहे. माफी मागणार का? मी राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा. सावंत कमिशन होते. रिपोर्ट आल्यानंतर विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी मी राजीनामा देण्याची घोषणा केली. माहिम येथील जरीवाला चाळीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. त्याच न्यायालयात हे प्रकरण गेले, न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही, असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्याचबरोबर जयदीप राणाने रिव्हर अँथम गाण्याला पैसा पुरवल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या आरोपानंतर राणाचं नाव गाण्यातून हटवण्यात आलं. यासंदर्भात अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली.

नवाब मलिक यांनी सोमवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले होते. यात जयदीप राणाचाही फोटो होता. जयदीप राणाला ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली असून, त्यावरून मलिकांनी थेट फडणवीसांना ड्रग्ज पेडलरसोबत कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई रिव्हर अँथम गाण्यातून जयदीप राणाचं नाव हटवण्यात आलं.

'नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले आहेत. आमच्याकडे काहीच नाही; त्यामुळे काहीही एक्सपोज करु शकणार नाहीत. आमच्याकडे जमिनी नाही. साखर कारखाने नाहीत. त्यामुळे ते आरोप करणारच, पण आम्ही कुणाला घाबरत नाही. मी आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कारण नसताना मलिक यांच्याकडून चिखलफेक केली जात आहे', असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT