Mumbai Nashik Highway Condition : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा चांगलेच संतापले आहेत. या महामार्गाची सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या भ्रष्टाचारामुळे दुरवस्था झाल्याचा आरोप करत खासदार बाळ्यामामा यांनी थेट न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे.
यात नितीन गडकरी यांचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला प्रतिवादी केले आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेत केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस काढली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला ठेवली आहे.
खासदार म्हात्रे म्हणाले यांनी याचिकेत, 'सरकारी अधिकारी व कंत्राटदारांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई (Mumbai)-नाशिक महामार्गाची दुरवस्था वर्षानुवर्षे कायम आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असल्याने शहापूर, कसारा, भिवंडीदरम्यान बस अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परिणामी विद्यार्थी, नोकरदार, शिक्षक अशा सर्व घटकांचे, वाहनधारकांचे खूप नुकसान होत आहे'.
'महामार्गावरील (Highway) खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. माजिवडा ते कल्याण बायपास रोड आणि पुढे माणकोली या मार्गात वाहनधारकांना सर्वाधिक त्रास होतो. शिवाय खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा जाच तर नेहमीचाच झाला आहे.
पडघा ते वासिंददरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांचेही खूप हाल होतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय, राज्य सरकार, भिवंडी उपविभागीय अधिकारी, ठाणे पोलिस आयुक्त आदींना या याचिकेत प्रतिवादी केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.
प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महामार्गाची दुर्दशा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणली होती. तसेच चांगला रस्ता उपलब्ध केला जाईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची विनंती केली होती, असे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले.
त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते; तरीही काहीच ठोस उपाययोजना झाली नाही. शिवाय टोलवसुली करणाऱ्या कंपनीकडून टोलवसुलीच्या आकडेवारीविषयी लपवाछपवी करण्यात येत असल्याचा आरोप करत, ही याचिका दाखल करावी लागल्याचे खासदार म्हात्रे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.