Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर; शिवाजी महाराजांच्या ‘त्या’ शिक्षेची आठवण करून दिली...

Rajanand More

Mumbai : राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. बुधवारी शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या घटनेचा निषेध केला. यावेळी पवारांनी सत्ताधाऱ्यांना शिवाजी महाराजांनी दिलेल्या एका शिक्षेची आठवण करून दिली.

पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत विचारले असता त्याला प्रत्युत्तर देताना पवारांनी यात राजकारण कसलं, असा प्रतिसवाल केला. शिवाजी महाराजांच्या काळात एक गोष्ट लोकांना भावल्याचे सांगत पवारांनी रांझे गावचा पाटलाला महाराजांनी दिलेल्या शिक्षेचा प्रसंग सांगितला.

एका महिलेवर रांझेच्या पाटलाने अत्याचार केले होते. हे समजल्यानंतर महाराजांनी त्याचे दोन्ही हात कलम केले. एका भगिनीला त्रास दिला म्हणून महाराजांनी एवढा कठोर निर्णय घेतला. असा निर्णय घेणाऱ्यांचा पुतळा समुद्रकिनारी उभा केला. त्यात जो भ्रष्टाचार झाला, त्यामुळे ही मुर्ती उध्वस्त झाल्याचे दिसते, असे प्रहार पवारांनी केला.

कुणी सांगतंय वाऱ्याचा वेग होता. आणखी काही कारणे सांगितली जात आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावर झाले. आज त्याठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहचला आहे. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये, याचे तारतम्यही सरकारमध्ये नाही, अशा शब्दांत पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरची लोकांची तीव्र भावना समजून घेऊन आम्ही तिघांनी कार्यक्रम हाती घेतल्याचे पवारांनी सांगितले. महाविकास आघाडीकडून येत्या रविवारी घटनेच्या निषेधार्थ मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया यादरम्यान मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे.

रविवारनंतर राज्यभरातही आघाडीकडून ठिकठिकाणी जोडे मारो आंदोलन केले जाणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. यावेळी उध्दव ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. सरकार शिवद्रोही असल्याची टीका ठाकरेंनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT