Kiran Mane Sarkarnama
महाराष्ट्र

किरण माने प्रकरणात मोठी घडामोडी; चित्रीकरण थांबवण्याच्या आदेशाने वाद चिघळणार?

Kiran Mane controver : चित्रीकरण थांबवण्याचे आदेश

ऋषीकेश नळगुणे

सातारा : स्टार प्रवाह या वाहिनीवरील "मुलगी झाली हो..." (Mulagi Zali Ho) या मालिकेमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सध्या चांगलाच चर्चेत आहेत. भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने आणि त्या संदर्भात सोशल मिडीयावर व्यक्त झाल्याने स्टार प्रवाह वाहिनीने त्यांना थेट मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या गोष्टीचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. महाविकास आघाडीकडूनही किरण माने यांना समर्थन देण्यात आले.

काल (शनिवारी) किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. किरण मानेंना काढून टाकल्यानंतर आता थेट या मालिकेच्या चित्रीकरणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील गुळुंब गावात सुरु आहे. मात्र या गावातून किरण माने यांना समर्थन दर्शवण्यात आले असून मालिकेला विरोध करण्यात आला आहे. तसेच या मालिकेच्या चित्रिकरणाची परवानगी ग्रामपंचायतीने रद्द केली आहे.

आक्रमक भूमिकेत समोर येत गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामपंचायत गुळुंब यांनी सरपंच स्वाती माने यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अधिकृत परिपत्रक जारी करुन गावातील चित्रीकरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कलाकारासोबत दुजाभाव करुन त्याला कोणतीही सूचना न देता काढून टाकणाऱ्या प्रवृत्तींना आमच्या हद्दीत प्रवेश नाही, असा निर्वानीचा इशारा ग्रामपंचायतीने मालिकेच्या टीमला दिला आहे. ग्रामपंचयतीच्या लेटर पॅडवरुन एक निवेदन स्टार प्रवाह आणि संबंधित मालिकेच्या टीमला देण्यात आले आहे.

Gulumb Grampanchyat Letterhead

निवेदनात काय म्हटले आहे?

राजकीय भुमिका मांडणाऱ्या कलावंताला मालिकेतून काढलेल्या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह आणि मुलगी झाली हो या मालिकेच्या टीमने विसरु नये की, महाराष्ट्रात अजूनही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह आणि मुलगी झाली हो या मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणासाठी "ग्रामपंचायत गुळुंब, तालुका वाई, जिल्हा सातारा" परवानगी नाकारत आहे. तसेच अशा प्रवृत्तींना इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नसेल असा इशाराही ग्रामपंचायतीने या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. ह्या निवेदनाची कॉपी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT