NCPSP Politics : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या आवारात राडा झाला. गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि चार जणांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली. हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले होते. पोलिसांनी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसह नितीन देशमुख यांना देखील अटक केली होती. त्यापूर्वी गाडीचा दरवाजा लागल्यावरून नितीन देशमुख हे थेट गोपीचंद पडळकरांना भिडले होते.दोघांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली होती.
पडळकरांविरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितीन देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पक्षाच्या प्रवक्तांची नावे जाहीर केले. यामध्ये देशमुख यांना देखील प्रवक्तेपद देण्यात आले आहे. आता पक्षाची अधिकृत भूमिका मांडताना नितीन देशमुख दिसून येतील.
नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आक्रमक आणि कट्टर कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. जितेंद्र आव्हाड यांचे ते निकटवर्तीय आहेत. पडळकरांसोबत वाद झाल्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंध होती तेव्हा अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती तेव्हा अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी आणि त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये नितीन देशमुख हे आघाडीवर होते.
नितीन देशमुख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये देखील पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची देखील जबाबदारी होती. मुंबईतील घाटकोपर परिसरात स्थानिक राजकारण करत होते. मात्र, आता त्यांना मोठी संधी मिळाली आहे. त्यांच्या आक्रमक स्वभावमुळे पक्षाची भूमिका ते योग्य प्रकारे मांडतील असे सांगितले जाते. विशेष म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने टार्गेट केले जाते त्याला आता देशमुखांच्या रुपाने जशासतशे उत्तर देण्यात येईल, असे दिसते.
आज माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा अधिकृत प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक झाल्याची घोषणा आमचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड साहेबांनी केली आणि त्या यादीत माझं नाव आलं. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एका सामान्य घरातील, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला एवढं मोठं पद मिळेल. पण बहुजनांचा विचार करणारा हा पक्ष, विचारांशी तडजोड न करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.आजवर लोकांसाठी रस्त्यावर उतरलो, अन्यायाच्या विरोधात उभा राहिलो, आणि ज्या विचारधारेवर विश्वास आहे त्यासाठी किंमतही मोजली. आता तीच निष्ठा आणि लढाऊ वृत्ती घेऊन मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार आहे, अशी भावना नितीन देशमुख यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यानंतर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.