Sunil Gadakh
Sunil Gadakh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गडाखांना डावलण्यासाठी 40 वर्षे षडयंत्राचा वापर

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेवासे तालुक्यात शिवसेना ( Shivsena )भाजप ( BJP ) यांच्यातच प्रमुख लढत असण्याची शक्यता आहे. खरवंडी (ता.नेवासे) येथे आज एक कोटी 90 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ( 40 years of conspiracy theories to destroy Gadakh )

सुनील गडाख म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यात असलेले राजकीय कार्यकर्तृत्व मोठे होवू नये याकरीता जिल्हा व राज्यात लॉबी करुन षडयंत्राचा वापर करण्यात आला. शंकरराव गडाखांनाही त्याच पध्दतीने मोठा त्रास देण्याचा उद्योग झालेला आहे.आता संधी मिळाली असल्याने आम्ही काय चीज आहोत हे पाहिलेच असेल.

ते पुढे म्हणाले की, राजकीय जीवनात अनेकदा मान-आपमान होवूनही जेष्ठ नेते गडाखांनी संयम सुटू दिला नाही. झालेला त्रास कधी व्यक्त केला नाही.जे गुण कधीच कुणाला कळाले नाही ती पारख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओळखून तालुक्याला मंत्रीपद दिले.असे सांगून त्यांनी यातून उतराई म्हणून तालुका व जिल्हा भगवा करण्याचा ध्यास असल्याचे सांगितले. मंत्री गडाखांनी आतापर्यंत दीड हजार कोटीचा निधी तालुक्यात आणल्याचे सांगुन खरवंडी जिल्हा परिषद गट देशात मॉडेल गट करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच मुकुंद भोगे यांनी केले. सरपंच हरिभाऊ शिंदे, सेवा संस्था अध्यक्ष बाबासाहेब फोफसे, अंमळनेरचे सरपंच अच्युत घावटे, संदीप फाटके, एकनाथ रौंदळ उपस्थित होते. 'मुळा' चे संचालक संजय जंगले, नाथा पंडित, जयवंत लिपाने, भिकाजी जगताप, बाळासाहेब नवगिरे यांचे भाषण झाले. सोनई-करजगाव पाणी योजनेत नवीन वाड्यावस्त्या जोडण्यासाठी 23 कोटीचा निधी मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. संगमेश्वर महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र 'क' वर्गात समावेश केल्याबद्दल ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. विजय फाटके यांनी आभार मानले.

सत्ता आणि बदल...

पद नसताना पूर्वी दोन-पाच लाखाच्या निधीसाठी सभापतीचे दारं झिजवत होतो. आता सभापतीपद मिळाल्यानंतर एकट्या खरवंडी जिल्हा परिषद गटात 30 ते 40 कोटीचा निधी आणू शकलो. ही किमया मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे सुनील गडाख यांनी सांगून उपस्थितांना नेतृत्त्व जपण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT