Prashant Paricharak News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : प्रशांत परिचारकांचा मोठा निर्णय : वीस वर्षानंतर प्रथमच या निवडणुकीतून घेतली माघार

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur News : पंढरपूर अर्बन सहकारी बँकेच्या (Pandharpur Urban Cooperative Bank) निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनीच आपला अर्ज मागे घेत सार्‍यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, विरोधी समविचारी आघाडीने केलेले अपील सहायक निबंधक पुणे यांनी फेटाळून लावल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

या निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे व सहकार्‍यांनी समविचारी आघाडी स्थापन करून परिचारक गटाला आव्हानं दिले होते. मात्र, त्यांचे सर्व अठरा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध ठरविल्याने त्यांनी सहायक निबंधक पुणे यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, तेथे ही विरोधकांना दिलासा मिळाला नाही. सर्व उमेदवारी अर्ज बुधवारी नामंजूर करण्यात आले.

दरम्यान, आज १२ जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी परिचारक गटाने सतरा जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी सकाळी प्रशांत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. यामुळे परिचारक गटातील कार्यकर्त्यांसह विरोधकांमधून देखील आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, प्रशांत परिचारक यांचे चुलत बंधू राजाराम परिचारक यांचा संचालक मंडळात समावेश आहे.

प्रथमच त्यांना बँकेवर (District Bank Election) काम करण्याची संधी मिळाली आहे. पंढरपूर (Pandharpur) अर्बन बँकेच्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात ३१ शाखा असून २ हजार ९०० कोटीची उलाढाल आहे. ११० वर्षाची ही बँक सोलापूर जिल्ह्यात नामांकीत म्हणून ओळखली जाते. परिचारक गटाचे आता सतरा जागांसाठी सतराच अर्ज शिल्लक असून यात राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, डॉ. संगीता पाटील यांचा समावेश आहे.

थांबणे ही गरज बनते..

अर्ज माघारी घेतल्यानंतर परिचारक यांनी समाजमाध्यमावर याबाबत प्रतिक्रिया दिली. यामध्ये काही वेळा थांबणे ही गरज बनते. २००२ मोठे मालक तथा स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी बँकेत सेवेची संधी दिली होती. वीस वर्षानंतर आता नवीन युवकांना संधी देऊन संस्था भविष्यात वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. यासाठी नवीन पिढी तयार झाली पाहिजे. या दृष्टीकोनातून बँकेच्या संचालक पदभारातून मुक्त होत आहेत. तसेच आपल्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होवू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याने त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT