Tanaji Sawant News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant : शिंदेंचे ठाणे, चव्हाणांच्या नांदेडपाठोपाठ आरोग्यमंत्र्यांच्या भूममध्येही चिमुकलीचा तडफडून मृत्यू

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे.

Amol Jaybhaye

अब्बास सय्यद

Bhoom News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ठाणे त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड येथील प्रकरणे ताजी असतानाच भूममधील प्रकरामुळे राज्यातील आरोग्य सेवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम (जि. धाराशिव) शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन न मिळाल्याने १४ महिन्यांच्या चिमुकलीचा बुधवारी सकाळी तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे. शेकापूर (भूम) येथील सादिया सद्दाम पठाण या १४ महिन्यांच्या चिमुकलीस अचानक त्रास होऊ लागल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ऑक्सिजनची सुविधा नसल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालकास तपासण्याची तसदीही घेतली नाही.

या उलट त्यांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्यास सांगितले, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी विनवणी करूनही त्या चिमुकलीला ऑक्सिजन लावण्यात आले नाही. त्यामुळे मुलीचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी व शहरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी घेतली होती.

तहसीलदार सचिन खाडे, पोलिस (Police) निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. बी. गोसावी यांनी नातेवाइकांच्या तक्रारीनुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली होती. मात्र, नातेवाइकांनी शवविच्छेदनास नकार दिला. ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी तातडीने भेट दिली. ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींचा व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा पाढाच नागरिकांनी त्यांच्यासमोर वाचला. त्यांनी शेकापूरला जाऊन मृत मुलीच्या कटुंबीयांची भेट घेतली. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले.

भूम-परंडा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मतदारसंघ आहे. ते या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. मात्र, येथेच आरोग्य यंत्रणा सलाइनवर असल्याचे विदारक सत्य यानिमित्ताने सर्वांच्या समोर आले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय हे राज्यासाठी आदर्श असणे गरजेचे आहे. मात्र, येथे आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मी जरी मतदारसंघात नसलो तरी विकासकामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, अशा वल्गना करणारे पालकमंत्री आतातरी मतदारसंघात जमिनीवर येतील काय ? अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध आहे. येथे आणण्यापूर्वीच त्या मुलीचा मृत्यू झाला होता, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT