Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar News : भाजपने कोल्हापुरातही आणला दोन घराण्यातील वाद; रोहित पवारांचा घणाघात

Rahul Gadkar

Mumbai News : भाजपने पवार कुटुंब फोडलं हे दुर्दैव आहे. मात्र येथे येऊन तुम्ही दोन राजघराण्यात वाद निर्माण करत आहात. त्यांच्यात द्वेष निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे. भाजपचे हे राजकारण कोल्हापूर आणि महाराष्ट्रात चालणार नाही. दिल्लीवाले कोल्हापुरात सुद्धा दोन घराण्यातील वाद आणत आहेत. खासदार मंडलिक आणि भाजपसुद्धा तोच प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री चार दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. पंतप्रधान मोदी कोल्हापुरात येऊन द्वेष निर्माण करतात, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाचे राजकारण भाजपकडून (Bjp) सुरू आहे की काय अशी एक चिंता वाटत होती. मात्र, याठिकाणी आल्यानंतर कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांची विचार जपले आहेत, हे दिसून आले. आमचं ठरलंय महाराजच आणि काँग्रेसचा पंजा या मतदारसंघातून निवडून आणायचा आहे, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोदी विकासाबाबत बोलत होते. त्यांच्या आता लक्षात आले आहे. भाजपकडून विकास होणार नाही हे लक्षात आल्यानंतर हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून ही निवडणूक पार पाडण्याचा त्यांचा बेत आहे. फुले, आंबेडकर यांच्याबाबत बोलल्यानंतर त्यावेळी मोदी, फडणवीस गप्प होते. ज्यावेळी निवडणूक समोर येत आहेत, त्यावेळी महान व्यक्ती आठवतात. त्यावेळीच त्यांना पुरोगामी विचारांचे लोक आठवतात. विचारांचं देणंघेणं ह्यांना नाही. केवळ राजकीय पोळी भाजण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

मान गादीला मत मोदीला

पंतप्रधान मोदीपेक्षा तुम्ही गादीला कमी समजता. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे यांना काही पडलेलं नाही. गादी म्हणजे गाद्या नव्हे ती परंपरा आहे. आम्हाला परंपरा महत्त्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेला हात घालत आहात पण हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमध्ये जाऊन दादा खोटं बोलायला लागले

आज अजितदादा कुठे जाऊन बसलेत. ते सोसायटीमध्ये प्रचार करत बसले आहेत. आमच्यासोबत राहिले असते तर आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. पवार साहेबांच्या कार्यावर अजितदादा आता प्रश्न विचारायला लागले आहेत. पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यात खूप मोठा फरक आहे. भाजपमध्ये जाऊन दादा खोटं बोलायला लागले आहेत, असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

(Edited By : Sachin Wgahmare)

SCROLL FOR NEXT