Devendra Fadnavis, Ajit Pawar, Samadhan Autade News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Irrigation Scheme: मंगळवेढा उपसा सिंचन योजना अजितदादा-फडणवीस मार्गी लावणार का ?

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाल्यामुळे आमदार समाधान आवताडे दोन वर्षे प्रयत्न करीत असलेल्या मंगळवेढा (Mangalvedha) उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीचा मुहूर्त मिळणार आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळी गावांना वरदान ठरू पाहणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना 2009 पासून राजकीय व्यासपीठावर तरंगत आहे. स्व. आमदार भारत भालके यांनी 2014 मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवली.

त्यानंतर या योजनेचे पुनर्सर्वेक्षण करून पाणी आणि गावे कमी झाली होती. 2019 साली पाणी आणि गावे पुन्हा पर्वत करण्यात आली. 2019 महाविकास आघाडी सरकारने ज्या ताकतीने या योजनेला मंजुरी व निधी देणे अपेक्षित होते दुर्दैवाने ते झाले नाही. दरम्यानच्या, काळात झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) हे विजयी झाले. त्यांनीही या योजनेला मंजुरी द्यावी अशी मागणी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

त्याबाबतची मागणी पुन्हा जलसंपदा मंत्र्याच्या सोलापूर दौऱ्यातही केली. मात्र, राज्यातील सरकार आणि स्थानिक आमदार हे परस्परविरोधी असल्याचा परिणाम या योजनेच्या मंजूरीवर असल्याची चर्चा होती. परंतु अवताडे यांनी प्रयत्न सोडले नाही. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यशस्वी ठरलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचारात दिलेल्या शब्दाप्रमाणे राज्य सरकारचा ही करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे आमदार आवताडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्याने या योजनेला आणखीन गती आली.

गतवर्षी पावसाळी अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी लवकरच या योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला. मात्र, नंदुर येथील अवताडे शुगर च्या कार्यक्रमात या योजनेचे सुधारित दराप्रमाणे अंदाजपत्रक करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सहभागी झाल्यामुळे योजनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. फडणवीस सांगोला दौऱ्यावर मंगळवेढा मार्गे जात असताना आमदार अवताडे यांनी उपमुख्यमंत्र्याचे महामार्गावर स्वागत करून तालुक्याच्या प्रश्नाचे निवेदन दिले होते. त्यामुळे रखडलेल्या उपसा सिंचन योजनेच्या पाणी प्रश्नासंदर्भातील बैठक 5 सप्टेंबरला होणार असल्याचे आवताडे यांनी सांगितल्यामुळे या योजनेच्या मंजुरीला मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT