Vikram Kale
Vikram Kale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Old Pension Scheme : आमदारांची पेन्शन रद्द करा; पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा : आमदार विक्रम काळे आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : आमदारांची पेन्शन रद्द करा आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा. आज एक लाख रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला एक रुपयाही पेन्शन मिळत नाही. जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरातून पेटलेला वणवा आता राज्यातील ३६ जिल्ह्यांत पोचेल. सरकारला झुकावे लागेल; अन्यथा आम्ही सभागृह बंद पाडू,’’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी घेतली. (Abolish pension of MLAs; But apply old pension to employees : MLA Vikram Kale)

कोल्हापुरात (Kolhapur) माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका कर्मचारी, समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत विक्रम काळे बोलत होते.

‘बटण नीट दाबा; सतेज पाटील यांना पुन्हा पालकमंत्री करू’, असे म्हणताच उपस्थितांमधून ‘मुख्यमंत्री-मुख्यमंत्री’ असा आवाज आला. त्यावर काळे यांनी बटण नीट दाबलं, तर मंत्री, पालकमंत्रीच काय मग मुख्यमंत्रीही करू, असे स्पष्ट करताच टाळ्या-शिट्यांचा जोर वाढला. शिवसेनेचे काही साथीदार पळून गेले. ते चोर की साथीदार याचा निकाल जनता देईल, असे विक्रम काळे यांनी नमूद केले.

सतेज पाटील म्हणाले की, जुनी पेन्शन योजना आर्थिक सबबीचे कारण सांगून लागू केली जात नाही. स्टॉक मार्केटवर अवलंबून असलेली अन्यायकारी नवी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांवर लादली जात आहे. महागाई सहा टक्के वाढली की दोन टक्के परतावा मिळतो. सामान्य कर्मचाऱ्यांनी त्याच्या यातना भोगल्या आहेत. नवी पेन्शन योजना १७ लाख कर्मचाऱ्यांना अमान्य आहे. निवृत्तीनंतरचे शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न गंभीर आहेत.

जुनी पेन्शन लागू केली तरच माघार घेतली जाईल; अन्यथा निर्वाणीचा लढा सुरू झाला आहे, हे ध्यानात ठेवा,’’ असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना चार राज्यांनी लागू केली; मग महाराष्ट्र सरकारच मागे का आहे?

जुनी पेन्शन योजना लागू केली, तर सरकार दिवाळखोरीत निघेल, असे म्हणणे योग्य नाही. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे २२ हजार कोटी जमा आहेत. ते सरकार त्यांना परत द्यायला तयार नाही. ३४ हजार कोटी रुपये अदानी समूहाला देता, बारा लाख कोटींची कर्जे माफ करता. जाहिरातींवर दोनशे कोटी रुपये खर्च करता; मग या मागणीकडे दुर्लक्ष का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT