Adinath Sugar factory
Adinath Sugar factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आदिनाथ ‘बारामती ॲग्रो’च चालवणार : काहींचा डाव मी ओळखून आहे : रोहित पवार

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालविण्यात येईल. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिले. आदिनाथ कारखान्याच्या ता. 20 मार्च रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रो भाडेतत्त्वावर देण्याच्या विरोधात ठराव करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आदिनाथ बचाव समितीची भूमिका व ‘बारामती अॅग्रो’ची भूमिका यांच्यात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. (Adinath Sugar Factory to be run by Baramati Agro : Rohit Pawar)

गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबतही आमदार रोहित पवार यांनी परखड भाष्य केले. याबाबत आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, चुकीच्या आणि गैरव्यवस्थापनामुळे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्जबाजारी झाला होता. परिणामी राज्य सहकारी बँकेने तो जप्त करुन नियमानुसार टेंडर प्रक्रिया राबवून सर्वांत जास्त भाडे देऊ केलेल्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवावयास दिला.

दरम्यान, या कारखान्यावर दिल्लीस्थित ‘एनसीडीसी’ बँकेकडून पाच वर्षांपूर्वी घेतलेले 25 कोटी रुपये कर्ज आज 50 कोटी रुपये झाले आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीबाबत कायदेशीर मार्ग निघाल्यानंतर कारखाना चालवण्यासाठी त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबतच्या प्रक्रियेमध्येच सुमारे दोन वर्षे गेली. या बारीक-सारीक बाबी सभासदांना माहित नसतात. नियमानुसार श्री आदिनाथ कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला, तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव मंजूर केला आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी कारखान्यात वेगवेगळ्या नावाने समित्या स्थापन करून राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. कारखाना भाडेतत्वावर घेतल्यानंतरही तो सुरू न करणं हे कोणत्याही कंपनीच्या आर्थिक धोरणात बसत नसते. बारामती ॲग्रो कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी कंपनी आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यामागील मूलभूत कारण लक्षात घेतले पाहिजे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काही मंडळी सभासदांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असली तरी मीही राजकारणात असल्याने ही कोण मंडळी आहे आणि त्यांचा डाव काय आहे, हे मी ओळखू शकतो. हा कारखाना सुरू न होण्यात काही मंडळींचा व्यक्तिगत स्वार्थ दिसतो आणि या स्वार्थापायीच जाणीवपूर्वक कायदेशीर किंवा सभासदांच्या आडून अडथळे आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले.

ते म्हणाले, ‘‘विकासाच्या आड राजकारण आणणारा मी कार्यकर्ता नाही. ‘बारामती ॲग्रो कंपनी’ आणि करमाळा तालुका यांचे आजचे नाही, तर 2007 पासून म्हणजेच गेल्या पंधरा वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. करमाळ्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या साडेचार लाख टन उसाचे तर गेल्या वर्षीही 3 ते साडेतीन लाख टन उसाचे गाळप केले. चांगल्या भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिवाय ‘एनसीडीसी’ बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात उशीर होत असल्याचे दिसू लागल्याने केवळ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये, या हेतूने शेटफळगढे येथील ‘बारामती ॲग्रो’च्या युनिट एकचा विस्तार करुन गाळप क्षमता वाढविण्यात आली. त्याचा फायदा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आणि नोंद केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहिला नाही. तसेच, गाळप क्षमता वाढीमुळे दरवर्षीपेक्षा दीड ते दोन लाख टन जास्त ऊस गाळप करण्यात येत आहे.’’

करमाळा भागातील 300 पेक्षा अधिक युवकांना स्वतःची वाहने घेण्यासाठीही ‘बारामती ॲग्रो’ने सहकार्य केले. आज ही मंडळी स्वतःचा व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत आहेत. या भागातील मुला-मुलींचे शिक्षण, शेतकऱ्यांना खते, बियाणे, सिंचन संचाचा पुरवठा अशा अनेक बाबतीत ‘बारामती ॲग्रो’ची नेहमीच सहकार्याची भूमिका असते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील नागरिकांचा ‘बारामती ॲग्रो’वर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी कोणतीही समिती काढून कितीही राजकारण केले तरी त्यांचा बारामती ॲग्रोकडून आदिनाथ कारखाना चालवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

मोळी टाकायला मी स्वतः येणार

‘‘काही मंडळींनी काढलेली समिती ही कारखाना वाचवण्यासाठी आहे की राजकारण करुन स्वतःचा बचाव करण्यासाठी आहे’, अशी शंका निर्माण होत आहे. सभासदांनी कोणतीही चिंता करु नये. लवकरच कारखाना सुरु केला जाईल आणि बारामती ॲग्रोकडे नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जाईल. मोळी टाकण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. त्यावेळी कारखान्याबाबतची संपूर्ण वस्तूस्थिती शेतकऱ्यांना सांगितली जाईल,’’ असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT