Aditya Thackeray - Shekhar gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

"माझ्या संपर्कात रहा" : साताऱ्यात आदित्य ठाकरेंचा शेखर गोरेंना खास मेसेज

Aditya Thackeray | Shekhar Gore | Shivsena : शेखर गोरे यांना जिल्ह्यात मोठी जबाबदारी मिळणार?

सरकारनामा ब्युरो

बिजवडी : साताऱ्यातील पाटण व कोरेगाव या दोन मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार असून राज्यात नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्हा बँकेतही शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्या रुपाने शिवसेनेने प्रवेश केला आहे. त्याबद्दल आज शेखर गोरे यांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी शेखर गोरे यांना "माझ्या संपर्कात रहा" असा खास मेसेज दिला. त्यानंतर या मेसेजची दिवसभर चांगलीच चर्चा सुरु होती. त्यामुळे शेखर गोरे यांना आगामी काळात जिल्ह्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा इथे शिवसेना पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, शेखरजी सातारा जिल्हा बँकेत तुमच्या रुपाने शिवसेनेच्या भगव्याचा प्रवेश झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात ही शिवसेनेची ताकद वाढवायची आहे. एक दिवस आपल्याला संपूर्ण जिल्हा भगवामय करायचा आहे. आपण कायम माझ्या संपर्कात राहा, असा खास मेसेज त्यांनी दिला.

यावेळी शेखर गोरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या कानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या तक्रारी घातल्या. ते म्हणाले, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीने भाजपला बरोबर घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात व मतदारसंघात शिवसेना आपली ताकद वाढवत असताना मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कुटील कारस्थानं करत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात एकत्र सत्तेत असताना जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला विश्वासात घेत नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री,आमदार, पदाधिकारी आम्ही बँकेत कार्यक्रमाला गेलो नाही. आम्ही विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

याशिवाय ठाकरे यांच्या स्वप्नातला जिल्हा भगवा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात शंभूराज देसाई, नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकातही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनीही जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक देत असल्याची तक्रार आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी त्ययांनी मुंबईत या विषयावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान आज आदित्य ठाकरे, निलमताई गोऱ्हे यांनी शंभुराज देसाई, नितीन बानुगडे पाटील, आमदार शिंदे, शेखर गोरे यांच्याशी विश्रामगृहात कमराबंद चर्चा केली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती ठरवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT