Adinath Sugar Factory News
Adinath Sugar Factory News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Adinath Sugar Factory : करमाळ्याच्या पुढाऱ्यांना धक्का : आदिनाथ कारखाना 'या' कारणामुळे गेला प्रशासकाच्या हाती

आण्णा काळे

Solapur News : करमाळा (Karmala) तालुक्यातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Sugar factory) प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर देखील निवडणूक घेण्यास कसूर केल्याने कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. कारखान्यावरती प्रशासक नेमण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक सोलापूर (Solapur) राजेंद्र कुमार दराडे यांनी दिली आहे.

प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखा परीक्षक वर्ग -1 बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रादेशिक सहसंचालक विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी ही नियुक्ती केली. श्री .आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्याची अस्मिता मानली जाते. राजकीय दृष्ट्या हा कारखाना कायम चर्चेत राहिला आहे. कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने प्रारूप मतदार यादी मागवण्यात आल्या होत्या. निवडणूक खर्चापोटी कारखान्याकडून १० लाख रुपये भरले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी यापूर्वी दिली होती.

मात्र, कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे वाटत असताना प्रशासकाची नियुक्ती होणे विशेष मानले जात आहे. प्रशासकाची नियुक्ती नेमकी कशी झाली याबाबत मात्र अद्यापही तालुक्यातील लोकांमध्ये संभ्रम आहे. आज (ता 26) रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीच सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी प्रशासक म्हणून नियुक्त केलेले बाळासाहेब बेंद्रे हे कारखान्यास स्थळावरती उपस्थित होते.

कारखान्यावरती येऊन त्यांनी कारखान्याचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर दिवसभर बाळासाहेब बेंद्रे यांनी कारखान्याच्या विविध विभागांची माहिती घेतली. विशेष म्हणजे आज कारखाना स्थळावरती संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जाण्यासाठी संचालक निघाले होते. ही बैठक सुरू होण्यापूर्वीच प्रशासक असलेले बाळासाहेब बेंद्रे हे कारखान्यावर येऊन त्यांनी पदभार स्वीकारल्याने आजची संचालक मंडळाची बैठक देखील होऊ शकली नाही.

कारखान्यावरती सध्या बागल गटाची सत्ता होती. आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो ला भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया रद्द करून कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्यास आला होता. त्यामुळे आदिनाथ कारखाना राज्यभर गाजला. कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असल्याने निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच गटातटांनी तयारी सुरू केली होती. मात्र, प्रशासक आल्याने आता यापुढे कारखान्याची निवडणूक कधी होणार हे निश्चित नाही.

आदिनाथ कारखाना सुरू व्हावा, यासाठी रश्मी बागल, माजी आमदार नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले होते. मात्र, हा कारखाना राजकीय नेत्यांच्या हाती राहण्याऎवजी तो आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. तोही केवळ निवडणूक खर्च न भरल्याने. त्यामुळे तो करमाळ्यातील सर्वच राजकीय नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

जून 2022 मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अलीकडेच शासनाने सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे आदिनाथ कारखान्याची देखील निवडणूक होऊ घातली होती. निवडणुकीसाठी लागणारा निधी कारखान्याने भरणे गरजेचे होते. कारखान्याने फक्त दहा लाख रुपये भरले.

साधारणपणे 35 लाख रुपये भरणे गरजेचे होते. आमच्या कार्यालयाकडून वारंवार मागणी करूनही कारखान्याच्या निवडणुकीसाठी निधी भरू शकत नसल्याने प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. कारखान्याकडून निवडणूक घेण्यात कसूर केल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रादेशिक सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT