sharad pawar-Asaduddin Owaisi-mahesh kote- Farooq Shabdi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शरद पवारांनंतर ओवेसीही सोलापुरात घडविणार राजकीय भूकंप!

एमआयएमचे खासदार असदोद्दिन ओवेसी नोव्हेंबरमध्ये सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत.

प्रमोद बोडके

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात सोलापूरचा दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल या नेत्यांचा अनपेक्षितपणे राष्ट्रवादीत प्रवेश झाला. माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया यांनी या दौऱ्यात पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर आता एमआयएमचे खासदार असदोद्दिन ओवेसी आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार यांनी सोलापुरात येऊन ज्या पद्धतीने राजकीय भूकंप घडविला. त्याच पद्धतीने खासदार ओवेसी हेदेखील सोलापूरच्या दौऱ्यात राजकीय भूकंप घडविण्याची दाट शक्‍यता आहे. (After Sharad Pawar, Owaisi will also cause political earthquake in Solapur!)

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खासदार ओवेसी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत ‘एमआयएम’चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांच्यासह राज्यातील पक्षाचे नेते व पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. ओवेसी सोलापुरात आल्यानंतर जाहीर सभा घेणार की बंद खोलीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन सोलापूर महापालिका निवडणुकीची आगामी रणनीती ठरविणार? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयएमने 2017 च्या महापालिका निवडणुकीत 9 जागांवर विजय मिळविला होता. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह एमआयएमचे काही नगरसेवक सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत.

शरद पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी हजेरी लावली होती. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी या मेळाव्यात भाषणाच्या माध्यमातून केले होते. त्या मेळाव्याची माहिती, व्हिडीओ व छायाचित्र सोलापूर एमआयएमच्यावतीने खासदार ओवेसी यांच्याकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. एमआयएममधून राष्ट्रवादीत अथवा अन्य पक्षात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांबद्दल खासदार ओवेसी या दौऱ्यात काय बोलणार? फुटीर नगरसेवकांबाबतीत खासदार ओवेसी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे कोठे, एमआयएमचे शाब्दी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीची संपूर्ण सुत्रे माजी महापौर महेश कोठे यांच्या हातात दिली आहेत. महेश कोठे यांच्या माध्यमातूनच खरटमल, चंदेले यांचा प्रवेश झाला. पवार व ऍड. बेरिया यांच्यात भेट झाली. पवारांच्या या राजकीय भूकंपात महत्वाचे सूत्रधार म्हणून माजी महापौर कोठे यांनी जबाबदारी पार पाडली. खासदार ओवेसी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राजकीय भूकंप घडविण्याची मुख्य जबाबदारी एमआयएम शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांच्यावर असणार आहे. खासदार ओवेसी यांच्या सोलापूर दौऱ्यात सोलापूरच्या राजकारणातील काही महत्वाचे कार्यकर्ते व व्यक्ती एमआयएममध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एमआयएममध्ये कोण-कोण प्रवेश करणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT