Sharad Pawar-Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : पवारांपाठोपाठ सुशीलकुमार शिंदेंनीही रद्द केला पंढरपूर दौरा

Sharad Pawar-Sushilkumar Shinde Tour : आमच्या दोघांचा आजचा दौरा रद्द झाला असला तरी महाविकास आघाडीचा मेळावा लवकरच पुन्हा होणार आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही आपला पंढरपूर दौरा रद्द केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राज्यातील दोन नेत्यांनी पाठोपाठ दौरा रद्द केल्याने एकच चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. कार्यकर्तेही नाराज झाले आहेत. (After Sharad Pawar, Sushil Kumar Shinde also canceled Pandharpur tour)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, पवारांनी काही कारणास्तव आपला माढा आणि पंढरपूर दौरा रद्द केला आहे. त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पंढरपूर दाैरा रद्द केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांना काही अपरिहार्य कारणांमुळे पंढरपूरचा दौरा रद्द करावा लागला आहे. महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत. त्यामुळे पवार यांना भेटण्यासाठी मी जाणार होतो. आता पवारच येणार नाहीत, त्यामुळे मीही पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार नाही, असेही माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, आमच्या दोघांचा आजचा दौरा रद्द झाला असला तरी महाविकास आघाडीचा मेळावा लवकरच पुन्हा होणार आहे. आमची भेटही तात्पुरत्या स्वरूपात होती. आम्ही पुन्हा मेळावा घेणार आहोत

राज्यात ड्रग्ज रॅकेटची प्रकरणे बाहेर येत आहेत. सोलापूरसारख्या ठिकाणाहून मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी व्यवस्थित मॉनिटरिंग झालं पाहिजे. इंटलिजन्स एजन्सी अॅक्टिव्ह केल्या पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे असं मला वाटतं, असेही त्यांनी नमूद केले.

मुळात सोलापूरसारख्या ठिकाणी ड्रग्ज सापडण्याची ही पहिली वेळ नाही. मागेही एकदा ड्रग्ज सापडले होते, ही दुसरी वेळ आहे. पण, हे बऱ्यापैकी कंट्रोल झालेलं आहे. एका जिल्ह्यापुरता हा प्रश्न आहे, यात सर्व राज्याला इनव्होल करण्याची गरज नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभा आणि मराठा आरक्षणावरही शिंदे यांनी भाष्य केले. राज्य सरकारने केलेलं प्रॉमिस पूर्ण केलंच पाहिजे, अशी परिस्थिती खूपदा येते, आमच्याही वेळेस आली होती. पण एखादी गोष्ट मान्य केली असेल तर ती आमलात पण आणली पाहिजे, असे खडे बोलही शिंदे यांनी राज्य सरकारला सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT