Ajit Pawar In Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar in Ahmednagar : अजित पवारांची खेळी, जुना पत्ता काढला बाहेर; थोरातांच्या भाच्याला नियुक्तीपत्र..

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यात मोठी राजकीय खेळी खेळली आहे. 2019 पासून राष्ट्रवादी आणि राज्याच्या राजकारणापासून दूर असलेले संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपातळीवर पुन्हा संधी दिली आहे.

संग्राम कोते पाटील यांची पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश या दोन्ही संघटनेच्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे. संग्राम कोते पाटील हे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. (Latest Marathi News)

संग्राम कोते पाटील यांना नियुक्तीपत्र देताना अजित पवार यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते. संग्राम कोते पाटील यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर आजारपणाचे कारण देत राजीनामा दिला होता.

राजकारणापासून लांब झाले होते. कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्षाशी जोडले गेले आहेत. विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी संभाळले आहेत. त्यांनतर त्यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती.

या काळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संघटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले. आंदोलने केली होती. 'वन बूथ, टेन युथ', ही संकल्पना प्रभावीपणे राबवली होती. यातून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटन मजबूत झाले होते.

या उपक्रमांचे शरद पवार यांनी देखील कौतुक केले होते. कोते पाटील यांच्या कामाचे कौतुक शरद पवार यांनी भाषणातून देखील करायचे. मात्र त्यांनी अचानक आजारपणाचे कारण देत फेब्रुवारी २०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा राजीनामा दिला.

कोते पाटील यांनी पाठीच्या आजाराने त्रस्त असल्याचे कारण त्यावेळी दिले होते. त्यामुळे त्यांना प्रवास करता येत नव्हता. राजीनामा देण्यापूर्वी पक्षाने त्यांची जाहीरनामा समितीवर देखील निवड केली होती.

मात्र आजारपणामुळे त्यांनी निवडणुकांपूर्वीच राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला. आजारपणामुळे जर पदाला न्याय देता येत नसेल, तर बाजूला झालेले बरे, या विचाराने आपण राजीनामा देत आहे.

मात्र, आपण कायम पक्षाबरोबर असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले होते. २०१९ च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे निर्धार परिवर्तन यात्रा काढली होती. या यात्रेत देखील कोते पाटील सहभागी झाले नव्हते.

संग्राम कोते पाटील हे ज्यावेळी पक्षात कार्यरत होते, त्यावेळी अजित पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. अजित पवार यांनी कोते पाटील यांना देखील बळ दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कोते पाटील यांनी राज्यभरात शंभराहून अधिक मोर्चे काढले होते.

गाव आणि महाविद्यालय जिथे, तिथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची शाखा या उपक्रमातंर्गत तीन हजाराहून अधिक शाखा कार्यरत केल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या शाखा अन्य राज्यात देखील कार्यरत केल्या होत्या.

नवनवीन संकल्पना राबबून पक्ष संघटना बळकट करण्याची कसब कोते पाटील यांच्यात आहेत. तेच हेरून अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिल्याचे बोलले जात आहे.

संग्राम कोते पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर -

राष्ट्रवादीतून फुटून राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप महायुतीत सत्तेत सहभागी झाला आहे. तोंडावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका होणार आहे.

पुढील वर्षभर निडवणुकांचा काळ राहणार आहे. अजित पवार यांनी संग्राम कोते पाटील यांच्यातील संघटन कौशल्य हेरून आहेत. अजित पवार हे लोकसभेसह पुढील काळात येणारी प्रत्येक निवडणूक पूर्ण ताकदीने राज्यात लढणार, असे हे संकेत आहेत.

संग्राम कोते पाटील जेव्हा पक्षात कार्यरत होते. तेव्हा राष्ट्रवादी सत्तेविरोधात होती. त्यामुळे आंदोलने आणि मोर्चातून काम दिसत होते. आता राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजप महायुती सत्तेत आहे. महायुतीत तीन पक्ष आहेत.

त्यामुळे संग्राम कोते पाटील यांना अजित पवार यांनी दिलेली संधी आव्हानात्मक आहे. सत्तेत राहून कोते पाटील संघटन कसे मजबूत करतात, याकडे आता नगर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT