Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

श्री. पवार म्हणाले, ''किसन वीरांचे नाव असलेल्या कारखान्यावर एक हजार कोटींचा कर्जाचा बोजा असेल तर त्यापेक्षा कमी खर्चात नवीन कारखाना उभा राहू शकेल.

भद्रेश भाटे - Bhadresh Bhate

वाई : सहकारी संस्थांमध्ये चुकीचे काम होत असेल आणि ती संस्था कोणत्याही पक्षाच्या ताब्यात असली, तरी कोणतीही गय न करता त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले. सहकार वाचविण्याच्या कोणत्याही निर्णयाच्या पाठीशी शरद पवार व आम्ही सर्व ठामपणे तुमच्यासोबत उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

वाईतील कृष्णा पूल, भाजीपाला फळ मार्केट व नगरपालिका शाळांच्या इमारती या ३४ कोटी रुपये खर्चांच्या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात आमदार मकरंद पाटील यांचा पालिकेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

वृत्तपत्रांतील नितीन पाटील यांच्या बातमीचा संदर्भ देऊन श्री. पवार म्हणाले, ''किसन वीरांचे नाव असलेल्या कारखान्यावर एक हजार कोटींचा कर्जाचा बोजा असेल तर त्यापेक्षा कमी खर्चात नवीन कारखाना उभा राहू शकेल. कर्जाचा डोंगर असलेला कोणताही कारखाना ऊस उत्पादकांना चांगला दर देऊच शकणार नाही, हे सभासदांनी लक्षात घ्यावे. आज हा कारखाना सुरू होईल की नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी खंडाळा व प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला आहे. त्यासाठी मदत करायला तयार आहे. आम्ही भेदभाव करीत नाही; परंतु जनतेनेही चांगल्या विचारांच्या लोकांच्या हातात सहकारी संस्था द्याव्यात. विरोधी पक्षात गेले की गोमुत्राने पवित्र होतात. फक्त भाजपकडून विरोधकांच्यामागे चौकशा लावल्या जातात, हेही जनतेच्या लक्षात आले आहे.''

आमदार मकरंद पाटील यांच्या कामाचे कौतुक करताना रामराजे म्हणाले, ''मकरंद पाटील यांच्याकडून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याच्या अपेक्षा आहेत. त्यांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. रात्री जागरण करू नये. काम न झाल्यास जनता पर्याय शोधते, हे जाणून प्रकृतीची काळजी घ्यावी.'' बाळासाहेब पाटील म्हणाले, ''भौगोलिक विविधता असताना जनतेला न्याय देणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. मागील पाच वर्षांत विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले; परंतु महाविकास आघाडी सर्वांना बरोबर घेऊन काम करीत आहे.''

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ''कुणालाही न दुखावता जनतेची मने आणि मते जिंकणाऱ्या मकरंद पाटील यांचे कार्यकर्तृत्व पाहून लक्ष्मणराव पाटील यांची आठवण होते.'' आमदार मकरंद पाटील म्हणाले, ''मागील पाच वर्षे भाकड गेली होती. पत्र घेऊन गेले तरी सत्ताधारी तोंडही बघायचे नाहीत. सुदैवाने राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले, हा आनंदाचा क्षण होता. सत्तेत आल्यानंतर दादांनी तातडीने पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शंभर कोटी मंजूर केले.

तसेच वाईतील ब्रिटिशकालीन कृष्णा नदीवरील नवीन पुलासाठी १५ कोटी निधी दिल्याने आज वाईकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. किसन वीर कारखाना चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचा ऊस जात नाही, पेमंट मिळत नाही. खंडाळा व प्रतापगड कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज करून ठेवले आहे, याबाबत आपण लक्ष घालावे. तुम्ही आदेश द्या, काळजी करू नका. निवडणूक जिंकून दाखवू, असेही ते म्हणाले.

प्रताप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रास्ताविक केले. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, ॲड. श्रीकांत चव्हाण, चरण गायकवाड, राजेश गुरव, किशोर बागुल, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, कांताराम जाधव, दीपक ओसवाल, सीमा नायकवडी, रेश्मा जायगुडे, प्रियांका डोंगरे, स्मिता हगीर, शीतल शिंदे, आरती कांबळे यांनी स्वागत केले. पंचायत समितीच्या वतीने विक्रांत डोंगरे, बाजार समितीच्या वतीने लक्ष्मण पिसाळ यांनी सत्कार केला. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. भारत खामकर यांनी आभार मानले.

यावेळी नगरसेवक चरण गायकवाड, डॉ़. विजय ठोंबरे, विठ्ठल भोईटे, अशोक हगवणे, विशाल सावंत, साहिल भिसे, रमेश काळोखे व अनिल जगताप यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, उदय कबुले, सुनील माने, प्रदीप विधाते, सभापती मंगेश धुमाळ, राजेंद्र तांबे, संजूबाबा गायकवाड, संगीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT