Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : स्वबळावर लढा पण विरोधकांना फायदा नको

संजय आ. काटे

Ajit Pawar : राज्यात महाविकास आघाडी एकत्र काम करतेय. आगामी निवडणुकात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला स्वतंत्र लढल्यास फायदा होईल अशी स्थिती आहे तेथे स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत. श्रीगोंद्यातून तीच मागणी पुढे येत आहे, जिंकण्याची खात्री असेल तर नक्की स्वबळावर लढा मात्र विरोधकांना मतविभागणीचा फायदा होणार नाही याची दक्षता घ्या, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज कार्यकर्त्यांना दिली.

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशानिमित्त येथील बाजार समिती प्रांगणात सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुल जगताप होते.

पवार म्हणाले, सत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही. कधी येते कधी जाते. सार्वजनिक जीवनात काम करताना अडचणी येतात, मात्र त्याने खचून जायचे नसते. राहूल जगताप यांनी त्यांच्या भाषणात आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती तो धागा पकडून पवार म्हणाले, स्थानिक निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय जरूर घ्या. पुणे जिल्ह्यातही तो प्रयोग केला आहे. येथे मात्र एकविचारी गटांमध्ये मतविभाजन होणार नाही याची दक्षताही घ्यावी. दोन्ही काँग्रेस वेगळ्या लढल्या तर त्याचा फायदा विरोधकांना होणार नाही याची काळजी घ्या. पक्षातील कोणत्याही नेत्यांनी हलक्या कानाचे राहू नका. समंजसपणा दाखवा. एकमेकांशी स्पष्टपणे बोलून गैरसमज दूर करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुने-नवे न पाहता कर्तृत्ववान नेतृत्वाला संधी देतात, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राहुल जगताप म्हणाले, पवार कुटुंबीयांनी श्रीगोंद्याला नेहमीच भरभरून दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिंभे-माणिकडोह बोगद्याला मान्यता देण्याचे काम अजित पवारांनी केले. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार आम्ही केला असून सर्व संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाहाटा म्हणाले, मागील काळात वेगवेगळी भूमिका घ्यावी लागली. तेव्हाही पवार कुटुंबियांवर आमचे प्रेम कायम होते. रासपचा प्रदेशाध्यक्ष असतानाही विधानसभेला श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले. तालुक्यात राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळवून देऊ. यावेळी भाजपचे कार्यकर्ते शरद नवले यांनीही प्रवेश केला.

घनश्याम शेलार, तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, दीपक भोसले यांची भाषणे झाली. मुंबई राज्य बाजार समितीचे सभापती अशोक डख, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात, राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस, विरधवल जगदाळे, प्रशांत गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केले.

मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेने बांधलेल्या इमारतीचे उद्घघाटन पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी पवार म्हणाले, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का असा सवालही केला.

तर खर्च तुम्ही करा..

पवार म्हणाले, राज्यातील बाजार समितीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आमचा विरोध नाही पण एवढा खर्च समितींना परवडणार नाही. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा असेल तर राज्य सरकारने निवडणूक खर्चाची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT