सोलापूर : एकेकाळी राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला मोहोळ तालुका सध्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) व राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या गटबाजीने प्रचंड धुमसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र अनगरच्या मेळाव्यात हजेरी लावून माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक केले. तर त्याचवेळी अरन ते दौंड शुगर प्रवासादरम्यान उमेश पाटील यांना आपल्या गाडीत सोबत घेत अजित पवार यांनी तालुक्याला करेक्ट मेसेज दिला.
गटबाजी कुठे नाही? प्रत्येक पक्षात, प्रत्येक जिल्ह्यात अन् तालुक्यात गटबाजी आहे. गटबाजीची चर्चा फक्त कार्यकर्त्यांमध्येच होते. कारण नेता तालुक्याचा असो की राज्याचा, नेतृत्वाला जर गटबाजी करणारे दोन्ही कार्यकर्ते जवळचे असतील तर त्या गटबाजीच्या चर्चेला फारसे महत्व राहत नाही. पण मागच्या काही काळापासून माजी आमदार राजन पाटील यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, उस्मानाबादचे निरीक्षक रमेश बारसकर व माजी उपसभापती मानाजी माने यांनी प्रति राष्ट्रवादीच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सोलापूर राष्ट्रवादीचे माजी प्रभारी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणूक वगळता जाहीर सभेसाठी पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या फार महत्व आले होते. पापरी (ता. मोहोळ) अजित पवारांच्या स्वागताला दिसलेले उमेश पाटील अनगरच्या मेळाव्याा मात्र गैरहजर होते. त्यानंतर अरनच्या कार्यक्रमात मात्र उमेश पाटील अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. असेच काहीसे चित्र प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील परिवार संवादचा मेळावा घेण्यासाठी मोहोळमध्ये आल्यानंतर दिसले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागताची व त्यांच्यासोबत राहण्याची जबाबदारी उमेश पाटील प्रभावीपणे पार पडतात. मात्र मोहोळ तालुक्याच्या राजकारणातच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांना विरोध का करतात? असा सवाल सातत्याने उभा राहतो. यातून उमेश पाटील यांचा विरोध राष्ट्रवादीला नसून माजी आमदार राजन पाटील यांना असल्याचे ते वारंवार दाखवून देत आहेत. या विरोधावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जाहीरपणे काहीच का बोलत नाहीत? वरिष्ठ नेत्यांच्या मनात नक्की आहे तरी काय? अशा अनेक प्रश्नांनी मोहोळचे राजकारण गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.
माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत राहून नंतर त्यांच्या विरोधात गेलेले माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे हे सर्वजण आज राष्ट्रवादीपासून दुरावलेले आहेत. उमेश पाटील यांच्याबाबतीत काय होणार? या प्रश्नाच्या उत्तरात मोहोळच्या राष्ट्रवादीचा झेंडेकरी कोण? याचेही उत्तर दडले आहे. एकूणच मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांच्या दोन राष्ट्रवादीची चर्चा सध्या अनेकांच्या डोक्याचा भुगा करू लागली आहे.
जादू मोहोळच्या मतदारांची
मोहोळ तालुक्याने जसे प्रेम माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केले आहे, तसेच प्रेम राजन पाटील यांचे विरोधक म्हणून दिपक गायकवाड, नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर, माजी आमदार रमेश कदम, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केले आहे. मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांना मानणारा जसा मोठा वर्ग आहे, तसाच राजन पाटील यांना विरोध करणाराही वर्ग आहे. विरोधक म्हणून जोपर्यंत नेत्यांनी प्रतिमा जपली तोपर्यंत मोहोळ तालुक्याने राजन पाटील यांच्या एवढेच विरोधकावरही भरभरून प्रेम केले आहे. विरोधी मतांची विस्कटलेली मोळी पुन्हा बांधण्याचा प्रयत्न उमेश पाटील करताना दिसत आहेत.
मोहोळ तालुक्यातील विरोधी मतांची जादू २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवार मनोज शेजवाळ यांच्याबाबतीत दिसली तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम यांच्याबाबतीत दिसली. कोल्हापुरातून मोहोळ तालुक्यात आलेल्या धनंजय महाडिक यांनीही भीमा कारखान्याच्या दोन्ही निवडणुकीत राजन पाटील विरोधी मतांची जादू दाखवून दिली आहे. मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधी मतांचे प्रेम उमेश पाटील यांना मिळणार का?, विश्वासार्ह विरोधी नेतृत्व म्हणून उमेश पाटलांना जनता स्वीकारणार का? या प्रश्नाचे उत्तर आगामी निवडणुकांमध्येच दिसणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.