मोहोळ (जि. सोलापूर) : ‘मोहोळ (mohol) तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पापरी शाळेला मी नक्की भेट देईन’ असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई येथे पुरस्कार वितरणावेळी दिला होता. उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी (ता. ३० एप्रिल) मोहोळच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे ते आपला शब्द पाळणार का?, याची उत्सुकता पालकांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लागली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी २०२१ मध्ये शाळेची गुणवत्ता सुधारावी, शाळेचा नावलौकिक वाढावा या साठी ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम जिल्हाभर राबविला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या शाळांनी सहभाग नोंदवला होता. पुरस्कार मिळविण्यासाठी त्यात काही निकष लावण्यात आले होते, त्या निकषांची तंतोतंत पूर्तता जी शाळा करेल, त्या शाळेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येणार होता.
दरम्यान, मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शाळेने या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. दिलेल्या निकषांची शंभर टक्के पूर्तता केली होती. कुठल्या शाळेने कशी निकषांची पूर्तता केली, हे पाहण्यासाठी एक जिल्हास्तरीय समितीही तयार करण्यात आली होती. त्या समितीनेही पापरी येथे येऊन पाहणी केली होती. त्याच आधारे जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पापरी शाळेला जाहीर झाला होता, त्यामुळे पापरी शाळेचे जिल्हाभर कौतुक झाले होते. या उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या पुरस्काराचे वितरण ८ फेब्रुवारी २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडला. पापरी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांनी तो स्वीकारला होता.
पापरी शाळेने राबवलेले विविध उपक्रम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार भारावून गेले होते. तेथील ते प्रयोग पाहण्याची इच्छा उपमुख्यमंत्र्यांनी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्या वेळी त्यांनी मुख्याध्यापक खताळ यांना मी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यावर पापरी शाळेला नक्की भेट देणार असल्याचा शब्द दिला होता. तसेच, पुरस्कार वितरणाच्या वेळचा फोटो उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरही टाकला होता.
उपमुख्यमंत्री पवार हे शनिवारी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळे पुरस्कार वितरणावेळी मुंबईत शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलेल्या भेटीचा शब्द खरा करणार का, याची प्रतीक्षा विद्यार्थी व शिक्षक यांना आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि गावकऱ्यांना अजितदादा आपल्या गावची शाळा पाहण्यासाठी येतील का, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.