अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलिस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत उद्घाटन तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे नाव न घेता टीका केली. ( Ajit Pawar's question to Raj Thackeray: Have you slept for so many days? )
या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी, राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, चैताली काळे, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यातील राजकारण बदलते आहे. राज्यात काही जण अचानक बाहेर निघाली. आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करू लागली आहेत. अरे! एवढे दिवस काय झोपा काढल्या होत्या काय? बोलणाऱ्यांपैकी मागील सरकारमध्ये कोणी नव्हते का? अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायच्या व विकासाला महत्त्व देण्या ऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची समाजात वितुष्ट कसे निर्माण होईल, दरी कशी निर्माण होईल. आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुन्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतोय. एकमेकांना शुभेच्छा देतो आहोत. ही आपली संस्कृती हीच आपली परंपरा आहे. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्याच्या गोष्टी करून विकास होत नाही. विकासाला आपण महत्त्व देऊ या. आम्ही तीनही पक्षाची लोक वेगवेगळ्या विचारधारेची असूनही लोकांचे भले करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही सात-सात वेळेला लाखा-लाखाने निवडून गेलो. या वेळी आम्हाला कस बस निवडून आणले आहे. 800 मतं, मी तर माझ्या एक राऊंडला हजारो मते घेतो. हसन मुश्रीफ 40 हजार, वळसे पाटील 60 हजार तर मी एक लाख 20 हजार मताधिक्याने निवडून आलो. ही कामे करताना आम्ही साधू-संत नाही. आम्ही माणसे आहोत. आमच्या विचारांचा तरूण माणूस निवडून दिला, म्हणून ही विकासकामे देतोय मात्र पुढच्या वेळी मताधिक्या वाढले पाहिजे ही हात जोडून विनंती, अजित पवारांनी करताच उपस्थित काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हे पाहून अजित पवार म्हणाले, घोडा मैदान दूर नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत तुम्ही काय करता ते पाहू. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत मी सांगितलेली कामे केली नाहीत तर पहा पवारांची औलाद नाही. अशी आहे का धमक तुमची, असा दमही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भरला.
देशात कुठे असा मतदार संघ आहे का जिथे पवारांशिवाय दुसरं कोणी निवडूनच येऊ शकत नाही. लाटा आल्या गेल्या. आपण लोकांशी व्यवस्थित वागलो. जातीय सलोखा ठेवला. जातीपातीचे, नात्या गोत्याचे राजकारण केले नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण चाललो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.