सांगली : साखर कारखान्याच्या मालकीवरुन सध्या भाजपचे खासदार व शिवसेनेच्या आमदारामध्ये कलगीतुरा रंगला आहे. खासदार-आमदारामध्ये शाब्दीक युद्ध रंगले आहे. दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून नागेवाडीतील यशवंत कारखान्याच्या मालकीहक्कावरून खासदार, आमदार यांच्यात संघर्ष सुरु आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या माळरानावरील यशवंत साखर कारखान्याचा पंधरा दिवसांपुर्वी निकाल लागला आहे. कारखानाच्या मालकीवरुन आता त्यांच्यात जुंपली आहे. यशवंत कारखान्याच्याबाबतीत निकाल लागल्यानंतर अजून कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
खासदार संजय पाटील (Sanjay Ramchandra Patil) यांनी आमदार अनिल बाबर (mla anil babar) यांना लक्ष्य केलं आहे. संजय पाटील म्हणाले, ''नुकताच पंधरा दिवसांपुर्वी कारखान्याच्याबाबतीत निकाल लागला आहे. यशवंत कारखाना कुणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय घोटाळे झाले? त्याला जबाबदार कोण? यावर खोलात जाऊन योग्यवेळी लोकांसमोर बोलेन,"
"जिल्हा बँकेनं यशवंत कारखाना "2012-13 साली विक्रीस काढल्यावर आपण टेंडरच्या माध्यमातून त्यावेळच्या ऑफसेट प्राईसपेक्षा 28 कोटी रूपये जास्त देवून यशवंत कारखाना घेतला होता. त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि पझेशन दिलं. त्यानंतर अनिलभाऊंनी कोर्ट मॅटर सुरु केलं. गेल्या नऊ वर्षांमध्ये कोर्ट प्रकियेमुळे मला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु मी कधीही व्यक्तिगत टीका, टिप्पणी केलेली नाही. माझी कायदेशीर लढाई सुरु होती. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जात होतो,'' असे संजय पाटील म्हणाले.
संजय पाटलांच्या आरोपांना आमदार अनिल बाबर यांनी उत्तर दिलं आहे. अनिल बाबर म्हणाले, '' खासदार पाटील यांनी या कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर, आपणास वेगळा विचार करावा लागेल. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आपली न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण खासदारांच्या तोंडी दमबाजीची भाषा शोभत नाही. जर तासगावला बोलावलं तरी आपण एकटे यायला तयार आहे. गेली चाळीस वर्षे संघर्षच करीत आलो असल्यानं, अशा दमबाजीला आपण घाबरत नाही,'' ''यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात? तुम्हाला हे शोभतच नाही. मुंगीही हत्तीला भारी पडू शकते,''असे बाबर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.