Ahmednagar News : राज्यातील शेतकऱ्यांना उसाच्या पिकाचा मोठा दिलासा आहे. चांगला चालणारा कारखाना शेतकऱ्यांना अपेक्षित दर देतो. मात्र काही वर्षांपासून राज्यातील साखर कारखानादारी अडचणीत आली होती. अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यात कारखान्यांवरील आयकराचा मोठा बोजा होता. तो कमी करण्यासाठी वीस वर्षांपासून लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते झटत होतो, मात्र त्याला यश आले नाही. हा प्रश्न घेऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी झटक्यात सोडवला, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात दिली. (Latest Political News)
राज्य सरकार श्रद्धा आणि सबुरीतून काम करत असल्याचे सांगून पवारांनी शासनाने घेतलेले आजपर्यंतचे निर्णय लोकहिताचे असल्याचा दावा केला. पवार म्हणाले, "देशातील अनेक राज्य सरकारे आपापल्या पद्धतीने काम करतात. राज्यकर्ते मंत्रालयात बसून निर्णयही घेतात, मात्र लोकांसाठी असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यत पोहोचत नाहीत. यामुळेच राज्याने शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाचे आयोजन करून लोकहिताच्या योजना लोकांच्या दारात जाऊन पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. ज्येष्ठ कलावंतासाठी शासन कटिबद्ध आहेत. राज्यातील सर्व घटकांसाठी लाभ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात आहे. या देशात राज्यात महापुरुषांचा आदर केला गेला पाहिजे यासाठीही आम्ही खबरदारी घेत आहोत."
उसाच्या पिकाने आपल्याला मोठे वरदान दिले आहे. चांगल्या पद्धतीने साखर कारखाना चालवतात तेथे चांगला भाव मिळतो. राज्यातील सहाकारचे जाळे नगर जिल्ह्यात उभे राहिले. याच जिल्ह्यात पद्मश्री विखे पाटलांनी पहिला साखर कारखाना उभा केला. त्याचे अनुकरण संपूर्ण जिल्ह्यात झाल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट करताना कारखानादारीपुढील अडचणींचाही उहापोह केला.
पवार म्हणाले, "आता कारखाना चालवताना अनेक अडचणी येतात. विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. काळानुरुप अनेक बदल कारवे लागणार आहेत. आपल्याला उसापासून फक्त साखर तयार करून चालत नाही. बगॅसपासून वीज तयार करावी लागते. इथेनॉल तयार करून त्यावर गाडी कशी चालेल ते पहावे लागते. गृहमंत्री अमित शाहांनी सांगितले की इथेनॉल तयार करून आपल्याला परकीय चलन वाचवायचे आहे. ब्राझीलमध्ये १०० टक्के गाड्या इथेनॉलवर चालत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्रॅक्टरही इथेनॉलवर चालवण्याचे आवाहन केले आहे. परंपरा वेगळी असली तरी काळानुरुप बदला करावे लागणार आहेत."
राज्यातील साखर कारखान्यांवरील असलेले साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ केल्याचे सांगून पवारांनी अमित शाहांचे कौतुक केले. अजितदादा म्हणाले, "राज्यातील सहकारी साखर कारखाने कराच्या बोजाखाली दबल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. हा कर कमी करण्यासाठी गेल्या वीस वर्षांत आम्ही अनेक प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने त्याला यश आले नाही. अमित शाहांना सहकारी कारखान्यांचे महत्व माहीत असल्याने त्यांनी झटक्यात कारखान्यांवरील साडेनऊ हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला."
"हा आयकराचा पैसा तुमच्या-माझ्या उसातील बिलातून जाणार होता. या निर्णयामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. हा आकडा फक्त आयकराचा आहे. त्यावर व्याज आणि दंड लावला तर ही रक्कम कुठल्या कुठे जाते. शाहांनी यावर तोडगा काढून कारखान्यांसह शेतकऱ्यांची आयकराच्या जाचातून मुक्तता केली", असा दावाही अजित पवारांनी यावेळी केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.