Shambhuraj Desai, Udhav Thackeray
Shambhuraj Desai, Udhav Thackeray Sakal Design
पश्चिम महाराष्ट्र

संतापलेल्या शंभूराज देसाईंचा राष्ट्रवादीला इशारा....

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हात मिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकात शिवसेना स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या नवीन ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी आज शासकिय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार महेश शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव, नंदकुमार घाडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री देसाई म्हणाले,‘‘ गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ठाकरे सरकारने केलेली विविध कामे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेपर्यंत पोचविणार आहेत. कोविडच्या सव्वा वर्षांच्या कालावधीत राज्याचे एक लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. तरीही कोणत्याही विभागाला निधी कमी पडू दिला नाही. शेतकऱ्यांना २२ हजार कोटींची कर्जमाफी दिला. सेवेत असताना मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांप्रमाणे ३९० जणांना मदत दिली.

एकट्या कोविडसाठी साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले. कोरोना काळात मोदींनी खासदारांचा निधी गोठवला. पण, राज्य सरकारने आमदार फंडात एक कोटींनी वाढ करुन तो चार कोटी केला. त्यापैकी ३० टक्के निधी कोविडसाठी खर्च केला. आगामी काळात आरोग्य सेवांसाठी पाच हजार कोटींची तरतूद केली असून, आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च केले आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना ४४९० कोटींचा मदत निधी दिला आहे. महिला सुरक्षेसाठी असलेल्या पथदर्शी प्रकल्पातून ३७ हजार महिलांनी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले आहे.

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळायचा का नाही, ते आता ठरवू.’’ जिल्हा बॅंकेत शिवसेनेला चार जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आमची होती, असे सांगून प्रा. बानुगडे म्हणाले, ‘‘आम्ही स्वत: च्या बळावर दोन जागा निवडून आणल्या आहेत.’’

महेश शिंदे म्हणाले,‘‘ जिल्हा बॅंकेत कोरेगाव आणि माणचे असे दोन संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी माझ्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सुनील खत्री हेही आमचेच आहेत.’’ कोरेगावात भावकी ही गाव व तालुका पातळीवर असेल. बाहेरच्या लोकांसाठी भावकी नाही, असा टोलाही त्यांनी शशीकांत शिंदेंना लागावला.

एका फोनवर मुख्यमंत्र्यांची मान्यता....

कोरोना काळात साताऱ्यात जंबो कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी माझ्या एका फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आदेशाची मागणी न करता मान्यता दिली होती, याची आठवण सांगून गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले,‘‘ जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या डोसचे ८५ टक्के, तर दुसऱ्या डोसचे ४५ टक्के कोरोना लसीकरण पूर्ण झाले.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT