Samadhan Autade-Devendra Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Candidate : आवताडेंना दुसऱ्यांदा संधी; ‘सोलापूर मध्य’मधून कट्टर हिंदुत्ववादी चेहऱ्याला पसंती!

Assembly Election 2024 : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे, तर सोलापूर शहर मध्य मतदासंघातून देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून कट्टर हिंदुत्ववादी चेहरा भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 October : भारतीय जनता पक्षाने 22 उमेदवारांची दुसरी यादी आज (ता. 26 ऑक्टोबर) सायंकाळी जाहीर झाली. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे, तर सोलापूर शहर मध्य मतदासंघातून देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून युवा आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे.

पहिल्या दोन यादीनंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, करमाळा मतदारसंघांतील उमेदवारांची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. माळशिरस आणि बार्शीची उत्सुकता जादा असून या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. बार्शीत भाजपच्या पाठिंब्यावर राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडून आले आहेत. त्यांनी या वेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना उघडपणे विरोध दर्शविला होता. कोणत्याही परिस्थितीत ते निवडणूक लढविण्यावर ठाम होते. मात्र, भाजपकडून त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.

विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे, त्याला पंढरपूर-मंगळवेढ्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्याची दिसलेली झलक कारणीभूत ठरलेली असू शकते. सामाजिक समीकरण जुळविण्यासाठी आणि मराठा मतदान खेचण्याच्या मुद्यावर आवताडे यांची उमेदवारी प्रभावी ठरल्याचे स्पष्ट होते.

पंढरपूरमधून आवताडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याने माजी आमदार प्रशांत परिचारक कोणती भूमिका घेतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे. परिचारक यांनी केलेली तयारी लक्षात घेत ते मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे पक्ष सोडून लोकसभा निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवले, त्या प्रमाणे पंढरपुरात प्रशांत परिचारक हे धाडस दाखवणार का, हा खरा सवाल आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा उमेदवारी डोळ्यासमोर कोठे यांनी घेतलेली जहाल हिंदुत्वाची भूमिका त्यांच्या पथ्यावर पडली आहे.

भारतीय जनता पक्षातून विरोध होऊनही कोठे यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकतेचा त्यांना फायदा झाल्याचे यावरून दिसून येते. त्यांच्या हिंदुत्वादी भूमिकेला आणखी धार चढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT