Arjunsinh Mohite-Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Dcc Bank Result : सोलापूर डीसीसीचा पहिला निकाल मोहिते पाटलांच्या बाजूने; माळशिरसमधून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी

Arjunsinh Mohite-Patil win : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीत माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील ५० मतांनी विजयी झाले. मोहिते पाटील गटाच्या विजयाची ही पहिली नोंद ठरली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 27 November : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक मतमोजणीत पहिला निकाल मोहिते पाटील गटाच्या बाजूने लागला आहे. माळशिरस सोसायटी गटातून अर्जूनसिंह मोहिते पाटील हे तब्बल ५० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निकालात मोहिते पाटील यांनी पहिला गुलाल उधळला आहे.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही एक-दोन जागा वगळता आमच्या इतर सर्व जागा निवडून येतील, असे विधान केले होते. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे माळशिरस सोसायटी मतदारसंघातून अर्जूनसिंह मोहिते पाटील हे विजय झाल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी भाजपप्रणित सहकार विकास पॅनेल आणि मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी पॅनेलमध्ये लढत झाली होती. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आव्हान दिले होते.

स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे माळशिरस विकास सोसायटीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रणित सहकार विकास पॅनेलचे उमेदवार शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांचा पराभव केला आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना 83 मते मिळाली आहे, तर शहाजीराव देशमुख यांना 33 मते मिळाली आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी तब्बल ८ वर्षांनंतर गुरुवारी (ता. २६ नोव्हेंबर) मतदान झाले हेाते. बॅंकेच्या १९ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्याने ९ जागांसाठी ८६.९४ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक १०० टक्के मतदान हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट तालुक्यात तर सर्वांत नीच्चांकी ७१.२५ टक्के मतदान हे उत्तर सोलापूरमध्ये झाले होते.

माळशिरस सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माळशिरसमध्येही अर्जूनसिंह मोहिते पाटील यांना एकेकाळचे मोहिते पाटील समर्थक राहिलेले शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांनी चॅलेंज दिले होते, त्यामुळे या लढतीचा निकाल काय येणार, याची उत्सुकता होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT