Sangli, 19 October : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जतना पक्षाचे उमेदवार डॉ स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीत सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांनी हजेरी लावली. आमदार लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी यापूर्वीच भाजपत प्रवेश केला आहे. त्यामुळे अरुण लाड यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची सांगलीत भाजप उमेदवारासाठी प्रचार सभा झाली. या सभेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णा डांगे, यांच्यासोबतच दोन्ही उमेदवार उपस्थित हेाते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य अरुण लाड उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपने त्यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले हेाते.
वास्तविक, अरुण लाड हे मागील निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार येताच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांनी मुलगा शरद लाड यांना उमेदवारीची अट घातली होती. प्रत्यक्षात भाजपने शरद लाड यांना कात्रजचा घाट दाखवत डॉ स्मिता जाधव यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लाड नाराज झाले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले आहे.
एकीकडे शरद लाड यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड हे महायुतीच्या प्रचारापासून लांब हेाते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला अरुण लाड यांनी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार लाड यांनी महायुतीच्या सांगलीतील मेळाव्याला हजेरी लावल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या स्टेजवर महायुतीमधील मंत्री आणि आमदारांसह अरुण लाड यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. आमदार अरुण लाड भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. पुत्र शरद लाड यांच्या पाठोपाठ आमदार अरुण लाड हे देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.