Crime
Crime Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वर्दी दिसताच वरात्यांची पळापळ : नवरदेवाची वरात पोचली पोलिस ठाण्यात...!

विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर ) - कोविड निर्बंधाच्या काळात पोलिस दिसताच वऱ्हाड्यांची पळापळ व्हायची मात्र कोविड निर्बंध काढूनही राहुरी तालुक्यातील एका लग्नात पोलिस दिसताच वऱ्हाड्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी कारवाई करत नवरदेवाची वरात थेट पोलिस ठाण्यातच नेली. या घटनेची सध्या जिल्हाभर चर्चा होते आहे. ( As soon as the police appeared, the party started running away: Navradeva's party reached the door of the police ...! )

मंगलाष्टक झाली. ताशा-वाजंत्री वाजली. वऱ्हाडी सावध झाले. क्षणार्धात पंगत बसली. वाढप्यांची लगबग सुरू झाली. अन् लग्नमंडपात पोलिसांचा प्रवेश झाला. पत्रावळ्या सोडून उष्ट्या हाताने वऱ्हाडींनी धूम ठोकली. नववधूचे आई-वडील, नवरदेवाची आई-मामा अन् खुद्द नवरदेव यांना पोलिसांनी गाडीत घातले. त्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात पोचली. अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला..!

राहुरी तालुक्यातील एका गावात काल (शुक्रवारी) ग्रामीण रुग्णालयासमोर एका 16 वर्षे 7 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू असल्याची खबर राहुरी पोलिस ठाण्यात मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ चार पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी धाडला. खासगी वाहनातून आलेल्या पोलिसांनी थेट लग्न मंडपात प्रवेश केला. पोलिसांना पाहताच वऱ्हाडींच्या घामाच्या धारा वाढल्या. पंगत अर्धवट सोडून वऱ्हाडींनी धूम ठोकली.

नवरी मुलीच्या आई-वडिलांनी फक्त साखरपुडा झाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, नवरी मुलीने मंगलाष्टकं होऊन डोक्यावर तांदूळ पडल्याचे पोलिसांना सांगितले. विवाह संपन्न झाल्याची खात्री होताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मुलीचे आई-वडील, मुलाची आई व मामा आणि खुद्द नवरदेवाला गाडीत घालून, त्यांची वरात राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

मुलीचे आई-वडील, नवरदेवाची आई, मामा व नवरदेव अशा पाच जणांवर बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT