Shivaji Kardile News & Prajakt Tanpure News, Shivaji Kardile criticise Prajakt Tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात सत्तापरिवर्तन होताच तनपुरेंचा डाव कर्डिलेंनी उलटला

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांच्या समर्थकांच्या ताब्यात नागरदेवळेसह परिसरातील तीन ग्रामपंचायती आहेत.

दौलत झावरे

Kardile Vs Tanpure : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांच्या समर्थकांच्या ताब्यात नागरदेवळेसह परिसरातील तीन ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत करण्याचा घाट प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी नगरविकास राज्यमंत्री असताना घातला होता. महाविकास आघाडीच्या या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने नागरदेवळ्यासह तिन्ही गावांत ग्रामपंचायती ‘जैसे थे’ राहणार आहेत. या गावांतील ग्रामपंचायत टिकावी म्हणून शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या प्रयत्नांना राज्यात सत्तापरिवर्तन होताच यश आले आहे.

नागरदेवळ्यासह वडारवाडी व बाराबाभळी या तीन ग्रामपंचायती मिळून नागरदेवळे नगरपरिषदेची निर्मिती तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 20 मे रोजी केली. याबाबत नागरदेवळ्याचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नगरपरिषद केल्याने नागरिकांवर करांचा बोजा वाढणार असल्याने नगरपरिषदेऐवजी ग्रामपंचायतच ठेवा, अशी मागणी पानमळकर यांनी केली होती. त्यांनी याविरोधात लढा उभारला होता. या लढ्याला आज यश आले आहे. नगरपरिषदेची अधिसूचना शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे या तीन गावांचा कारभार पुन्हा ग्रामपंचायतींकडे येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने तीन गावांचा विरोध असतानाही नगरपरिषद केली होती. मात्र, युती सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे गोरगरिबांना न्याय मिळाला आहे.

- सविता राम पानमळकर, सरपंच, नागरदेवळे

नगरपरिषदेच्या विरोधासाठी गावनिहाय झालेल्या ग्रामसभा

नागरदेवळे - 15 फेब्रुवारी 2022

वडारवाडी - 26 जानेवारी 2022

बाराबाभळी - 16 नोव्हेंबर 2021

चार महिन्यांत दोन प्रशासक

नागरदेवळ्यासह तीन गावांसाठी नगरपरिषदेच्या अधिसूचनेस 20 मे 2022 रोजी अंतिम मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून येथे प्रशासकांची नियुक्त करण्यात आली होती. सुरवातीला पहिले दोन महिने तहसीलदारांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्यानंतर कर्जत नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नागरिकांची गैरसोय

20 मेपासून अधिसूचना जाहीर झाल्यापासून ग्रापंचायतींचा कारभार संपुष्टात आल्यानंतर प्रशासक राज आले. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. ग्रामस्थांतून नगरपरिषद नको ग्रामपंचायत हवी, अशी मागणी होत होती.

दृष्टीक्षेपात

तीनही गावचे क्षेत्रफळ - 2033.40 हेक्टर, बिगर शेती क्षेत्र - 172.78 हेक्टर, शेतजमीन - 18060.71 हेक्टर

नागरदेवळ्यासह वडारवाडी व बाराबाभळीची नगरपरिषद रद्द झालेली आहे. तशी सूचना आज जारी झाली आहे.

- गोविंद जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, नागरदेवळे

ग्रामसेवक बदलीला ब्रेक

नागरदेवळ्यासह वडारवाडी व बाराबाभळी ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची इतरत्र नियुक्ती देण्याच्या हालचाली जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू होत्या. या हालचालींना मात्र आता ब्रेक लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT