Ruturaj Patil Amal Mahadik Shoumika Mahadik .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election: भाजपचं 'कोल्हापूर दक्षिण'मध्ये धक्कातंत्र ? ऋतुराज पाटलांना 'हा' नव्या दमाचा गडी टक्कर देणार ?

Deepak Kulkarni

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. पण जवळपास भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव निश्चित समजले जाते, असे असताना भाजपमध्ये अजूनही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत संभ्रमता निर्माण झाले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कारण शनिवारी (ता. 21) दिवसभर मतदारसंघातील मतदारांचे फोन उमेदवारीबाबत खणाणले आहेत. अज्ञातांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्व्हे सुरू केला असून यात भाजपकडून (BJP) तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे तीनही उमेदवार महाडिक कुटुंबातील आहेत. असे या सर्व्हे फोनमधून उघड झाले आहे.

दिवसभरात मतदारसंघातील अनेक मतदारांचे फोन खणाणले आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती असेल? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

सुरुवातीलाच विद्यमान आमदार काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचे नाव आहे. तर दोन नंबरला भाजपचे नेते माजी आमदार अमल महाडिक, तीन नंबरला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक आणि चार नंबरला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. एकंदरीतच पाहता या कॉल सर्व्हेवरून भाजपच्या उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाला आहे की काय? अशी उलट सुलट चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होण्याची निश्चित आहे. किंवा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

ऋतुराज पाटील यांना टक्कर देण्यासाठी महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. पण अमल की शौमिका महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत अजून स्पष्ट कल्पना नाही. मात्र, या मतदारसंघातून कृष्णराज महाडिक यांचे नाव समोर आल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघातून त्यांची लढण्याची तयारी आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी उमेदवारी दिली तर उत्तर मधून कृष्णराज महाडिक देखील असतील, असे देखील सूतोवाच केले आहे. मात्र, दक्षिणमधून या कॉल सर्व्हेच्या माध्यमातून समोर आल्यानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

एकंदरीतच पाहता त्रयस्थ यंत्रणेकडून हा कॉल असल्याने तो भाजपनेच केला असे म्हणता येणार नाही. पण भाजपकडून तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना कॉल भाजपकडूनच आल्याची शंका आहे. त्यामुळे एकंदरीतच पाहता या मतदारसंघातून भाजपचा तुल्यबळ उमेदवार कोण असेल? याची चाचपणी या कॉल सर्व्हेद्वारे केली असावी, असे अनेकांना शंका आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT