Rajan Patil-Dilip Sopal-Babanrao Shinde
Rajan Patil-Dilip Sopal-Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांचे निष्ठावंत बबनदादा, सोपल, राजन पाटलांचं नक्की काय ठरलंय!

प्रमोद बोडके

सोलापूर : (स्व.) गणपतराव देशमुख आणि (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने रिक्त झालेली जिल्ह्याच्या राजकारणातील श्रेष्ठींची पोकळी आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) आणि माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या निवडीने भरून निघाली. सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जिंकून नव्या श्रेष्ठींच्या यशस्वी मार्गदर्शनाचा श्रीगणेशाही झाला. आमदार शिंदे, माजी मंत्री सोपल आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. राज्यातील बदलत्या राजकारणाचे पडसाद सोलापूर जिल्ह्याच्याही राजकारणवर उमटू लागले आहेत. बदलत्या राजकारणात या तीनही ज्येष्ठ नेत्यांचे नक्की काय ठरलंय, याचे कोडे मात्र अजूनही काही सुटलेले नाही. (Babanrao Shinde, Dilip Sopal, Rajan Patil's roles are eagerly awaited in Solapur)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे सोलापूर जिल्ह्यातील एकेकाळचे कट्टर विश्वासू म्हणून आमदार बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील यांची ओळख होती. पाटील आणि शिंदे सध्या राष्ट्रवादीत आहेत. पण सोपल हे सध्या कोणत्या पक्षात आहेत, हे तेसुद्धा स्पष्टपणे बोलत नाहीत. मात्र, आपला पक्ष हा ‘शपक्ष (शरद पवार) हे ते नेहमी सांगतात. त्यामुळे त्यांना अजूनही पवारांचे निष्ठावंत मानले जाते. मात्र सद्यस्थितीत हे तीनही दिग्गज नेते शांत पण अस्वस्थ दिसत आहेत.

येत्या सोमवारी (ता. १९ सप्टेंबर) पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कुर्डूवाडी पंचायत समितीत (कै.) माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा पवारांच्या उपस्थितीत होत आहे. महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आणि आमदार शिंदे, माजी आमदार पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेनंतर शरद पवारांचा हा दौरा काय संकेत देऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील बहुतांश आमदार-खासदार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या नव्या शिवसेनेत जुन्या शिवसेनेतील आमदार शहाजी पाटील, माजी आमदार नारायण पाटील, नागनाथ क्षीरसागर, रश्‍मी बागल, संजय कोकाटे यांनी उघडपणे भूमिका स्पष्ट केली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने आणि माजी महापौर महेश कोठे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत. भविष्यात ते कोणाकडे जातील, त्यांची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिवसेनेतील या जुन्या नेत्यांचे नक्की काय ठरलंय, हे कळायला मार्ग नाही.

आमदार शिंदे आणि माजी आमदार पाटील यांनी मध्यंतरी दिल्लीत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केलेले अभिनंदन त्यांच्या भाजप चर्चेच्या अनुषंगाने प्रचंड गाजले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्लीतील या अभिनंदनावर सोलापुरात येऊन पडदा टाकल्याने तेव्हापासून राष्ट्रवादीला ‘खिंडार’ हे शब्द काही दिवसांपर्यंत का होईना पण थांबले आहेत. माढ्यात सध्या ना भाजपकडे प्रभावी नेता आहे, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे, त्यामुळे माढ्याच्या राजकारणात सध्या राज्यातील सत्तेची पॉलिटिकल स्पेस दिसत आहे. ही स्पेस भरून काढण्याच्या अनुषंगानेच मध्यंतरी आमदार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण होते.

गेल्या काही महिन्यांपासून मोहोळच्या राष्ट्रवादीत सुरू असलेले अनगर विरुध्द नरखेडचे वाक्‌युध्दही आता शांत झाले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोहोळ संदर्भात झालेल्या बैठकीनंतर मोहोळची राष्ट्रवादी सध्या तरी शांत झालेली आहे. ही शांतता कायमची आहे की वादळापूर्वीची आहे, याची कुजबुज मात्र जिल्हाभर सुरू आहे.

आमदार शिंदे, माजी मंत्री सोपल, माजी आमदार पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणातील व सहकारातील तीन ज्येष्ठ व दिग्गज नेते सध्या शांत आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मांडलेला सत्तेचा डाव कधीपर्यंत चालेल, सर्वोच्च न्यायालयातील विषय ‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत चालेल. या प्रश्‍नाचे उत्तर सध्या तरी कोणाकडेही नसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात वादळापूर्वीची शांतता मानली जात आहे.

मानेंचे ठरले दक्षिण...

विधानसभेची २०१९ ची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर शहर मध्यमधून लढणारे माजी आमदार दिलीप माने यांनी आगामी निवडणूक सोलापूर दक्षिणमधून लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यांनी पक्ष जाहीर केला नसला तरीही मतदार संघ जाहीर केल्याने त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. या मतदारसंघातील ग्रामीण भागासोबतच सोलापूर शहरातील मतदारसंघात माजी आमदार माने ॲक्‍टिव्ह झाले आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख यांच्या रूपाने भाजपचा आमदार असल्याने या मतदार संघात भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडे माजी आमदार माने यांना तिकडे पॉलिटिकल स्पेस तेवढीसी दिसत नाही.

‘सोलापूर शहरमध्य’चा चेहरा कोण

काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेचा आगामी उमेदवार कोण, हा प्रश्‍न खासगीत चर्चिला जात आहे. आमदार शिंदे सोलापूर लोकसभेच्या आगामी उमेदवार झाल्यास हा प्रश्‍न आणखी वेगळ्या पद्धतीनेही चर्चेत येऊ शकतो. माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादीत आल्यास त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने शहर उत्तरमधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात उतरविण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. माजी महापौर कोठे यांची राजकीय दिशा सध्या स्पष्ट होताना दिसत नाही, ते भविष्यात शिंदे गटात गेल्यास त्यांच्यासाठी शहर मध्यचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला जाऊ शकतो. काँग्रेसकडे असलेल्या शहर मध्यमध्ये भाजप अन्‌ शिंदे गटाचा चेहरा कोण, याची उत्सुकता सध्या निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT