Nitesh Rane Latest News
Nitesh Rane Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या बादशहा शेखचा ठावठिकाणा मिळालाय; पोलिस त्याला लवकरच पकडतील...

प्रफुल भंडारी

दौंड : दौंड शहरातील तरूणीचा विनयभंग करून जाब विचारणाऱ्या तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झाली आहे व पुढेही होईल. सरकार आमचं असल्यामुळे काम कसं करून घ्यायचं ते आम्ही करतोय. बादशहा शेख याचा ठावठिकाणा मिळाला असून पोलिस त्यालाही पकडतील, असा विश्वास भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. (Nitesh Rane Latest News)

दौंड शहरात २० आॅक्टोबर रोजी एका तरूणीचा विनयभंग करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी २१ दिवसांच्या विलंबानंतर गुन्हा दाखल केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता व दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल, आदी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात १७ नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांनी पीडितेच्या कुटुंबीयांसह पोलिस उप अधीक्षक राहुल धस व तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची भेट घेत त्यांना जाब विचारला होता.

संशयितांना पकडण्यासाठी विलंब होत असल्याने आक्रमक झालेले नितेश राणे यांनी आरोपींच्या अटकेसाठी ४८ तासांचा अवधी देत काही पोलिस व फरार आरोपींचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा गंभीर आरोप दौंड पोलिस ठाण्यातच केला होता. तसेच ४८ तासांमध्ये अटक न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नितेश राणे यांचे आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली. पोलिसांनी अद्यापपर्यांत या प्रककणातील फक्त चार संशयितांना अटक केली आहे.

दरम्यान, ४८ तासानंतरही बादशहा शेख यास अटक न झाल्याने आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून पुढील आंदोलन करण्यात न आल्याने चर्चांना उधाण आले आहे. आमदार नितेश राणे यांना या बाबत विचारले असता त्यांनी , या प्रकरणात चौघांना अटक झाली आहे. अपेक्षित ती सर्व कारवाई पोलिस करीत असल्याने पुढील आंदोलन केले नाही. पोलिस निरीक्षकांची लगेच बदली झाली आहे. आम्हाला या प्रकरणात जो अपेक्षित निकाल आहे तोही शंभर टक्के मिळेल, असा विश्वास आहे. अगर पोलिस एकदमच हाताची घडी घालून बसले असते तर विषय वेगळा असता, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT