Balasaheb nahata Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब नाहाटा म्हणाले, अजितदादा सुचवतील तोच श्रीगोंद्यातील पुढचा आमदार...

मुंबईतील राज्य बाजार समिती महासंघावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे वर्चस्व आहे.

संजय आ काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - मुंबईतील राज्य बाजार समिती महासंघावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे वर्चस्व आहे. या बाजार समिती महासंघावरचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असतानाही अजित पवारांच्या आशीर्वादाने बाळासाहेब नाहाटा हे सभापती झाले. नाहाटा यांची बाजार समिती महासंघाच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर लोणी व्यंकनाथ येथे काल ( ता. 14 ) नागरी सत्कार झाला. या प्रसंगी बोलताना बाळासाहेब नाहाटा यांनी श्रीगोंदे तालुक्यातील आगामी राजकीय परिस्थितीबाबत सुतोवाच केले. ( Balasaheb Nahata said, Ajit Dada will suggest the next MLA from Shrigonda ... )

नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब काकडे होते. विचारपीठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यासह गणपतराव काकडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, प्रवीण कुरुमकर, पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, बाळासाहेब थोरात, मितेश नाहाटा, मनिषा नाहाटा, सतीश बोरा, विजय शेंडे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी दिली. अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. तरीही बिनविरोध संचालक आणि आता सभापतीपदाची जबाबदारी दिली. त्यांचे हे उपकार विसरणार नाही. आमदारकीसाठी ते ज्याचे नाव सुचवतील तोच श्रीगोंद्यातील पुढचा आमदार असेल, असे सुतोवाच बाळासाहेब नाहाटा यांनी केले.

ते पुढे म्हणाले, गावाने माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळे अगोदर तालुक्यात कामाची संधी मिळाली. श्रीगोंदे बाजार समितीत नि:स्वार्थी काम केले. त्याचा फायदा आता होत आहे. राजकारणात अनेक पक्ष, नेते बदलले. हे सर्व विकासासाठी केले. अजितदादांनी विश्वासाने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला राष्ट्रवादीत नसतानाही बाजार समिती महासंघाचे सभापती केले. त्यांचे हे उपकार विसरणार नाही. यापुढे केवळ अजित पवार व राष्ट्रवादी यांच्यासाठीच काम करणार आहे. श्रीगोंद्याचा पुढचा आमदार हा राष्ट्रवादीचा करण्यासाठी जीवाचे रान करेल. ज्या नेत्याचे नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी येईल तोच आमदार होईल, असेही नाहाटा यांनी स्पष्ट केले.

भोस म्हणाले, नाहाटांचे राजकारण संपविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कायम पुन्हा भरारी घेवून राजकारणात पदे मिळविली. नागवडे कारखाना निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यावर नाहाटा कायमचे संपले. अशा बढाया मारल्या गेल्या. मात्र, अजित पवार यांनीच नाहाटांचा पद देत सन्मान केला, असे भोस यांनी सांगितले. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मुलामुळे बापाचा सन्मान

बाळासाहेब नाहाटा म्हणाले, अजित पवार यांचा तर मी कायम आभारी राहीन. मात्र, त्याचसोबत हे पद मिळवून देण्यासाठी माझा मुलगा मितेश याने लावलेली फिल्डींग मोलाची ठरली. वयाने लहान असला तरी त्याने दाखविलेली परिपक्वता मोठी होती आणि त्यामुळे मला हे पद मिळाले, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT