Balasaheb Patil, Dr. Atul Bhosale, Udayasinh Patil karad reporter
पश्चिम महाराष्ट्र

भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी उधळला गुलाल

बाळासाहेब पाटील यांचा अनेक वर्षानंतर जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

कराड : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या साथीने ८ मतांनी गुलाल उधळला आहे. त्यांनी माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. एका-एका मताची बेरीज करत बाळासाहेबांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करुन शिष्टाईतुन लढवलेल्या निवडणुकीत परफेक्ट नियोजन करत उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला. या विजयामुळे बाळासाहेब पाटील यांचा अनेक वर्षानंतर जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे.

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची मतमोजणी आज मंगळवारी झाली. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटातुन खुद्द सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर मैदानात उतरले होते. दोघांनीही आपले पत्ते ओपन करुन जास्तीत जास्त मतदान आपल्याचा व्हावे यासाठी फिल्डींग लावली होती.

सहकारमंत्र्यांनी बेरजेचे राजकारण करत थेट पारंपारिक विरोधक असलेल्या भाजपच्या भोसले गटालाच जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीतील मदतीसाठी साद घातली. त्यांनी भोसलेंबरोबर कृष्णाकाठच्या जेष्ठ आणि जाणत्या नेत्यांनाही मदत करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी भोसले गटाची सर्व मते आपल्याच पारड्यात पडावी यासाठी शेवटपर्यंत मोठे प्रयत्न केले.

दरम्यान अॅड. उंडाळकर हे स्वतःच्या हिंमतीवर आणि कट्टर समर्थकांच्या जीवावर निवडणुक लढवत होते. राज्याचे सहकारमंत्रीच या निवडणुकीत उतरल्यामुळे कऱ्हाडची ही लढत राज्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. त्या गटातील जास्तीत जास्त मते आपल्यालाच मिळावी यासाठी सहकारमंत्री पाटील व उंडाळकर यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा केल्याने मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

कऱ्हाड सोसायटी गटात १४० मते होती. आज सकाळी कऱ्हाड सोसायटी गटातील मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यामध्ये सहकारमंत्री पाटील यांना ७४ मते पडली. तर अॅड. उंडाळकर यांना ६६ मतांवरच रोखण्यात सहकारमंत्र्यांना यश आले. सहकारमंत्र्यांनी वर्षभरापासुन परफेक्ट नियोजन करुन उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला. या निवडणुकीच्या निकालामुळे कऱ्हाड तालुक्यातील भविष्यात होणाऱ्या बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांतही आता नवी समिकरणे दिसणार आहेत. त्याची झलकच या निवडणूकीच्या निकालात दिसुन आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT